रत्नागिरी : ‘माझा गाव माझा सरपंच’ या उपक्रमांतर्गत गणपतीपुळे ग्रामपंचायतीने मोबाईल अॅप तयार केले असून या अॅपचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ४.०० वाजता गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या फाटक सभागृहात पार पडणार आहे. ग्रामपंचायतीचे मोबाईल अॅप तयार करणारी महाराष्ट्रातील गणपतीपुळे ग्रामपंचायत पहिली ठरली आहे.सर्वसामान्यांची सरकार दरबारी असलेली कामे करण्यासाठी व गावात निरनिराळ्या योजना राबविण्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरेल, असे मत सरपंच महेश ठावरे यांनी व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, गटविकास अधिकारी जे. डी. साखरे, सभापती महेश म्हाप, गणपतीपुळे सरपंच महेश ठावरे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश ठावरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)या मोबाईल अॅपद्वारे विविध सरकारी योजनांची माहिती सामान्य ग्रामस्थांना व्हावी, यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपमुळे गावासह ग्रामपंचायतीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. हे अॅप ‘गो स्मार्ट सोल्यूशन प्रा. लि.’ या कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे.
गणपतीपुळे ग्रामपंचायत आता मोबाईल अॅपवर
By admin | Published: August 26, 2016 1:05 AM