गडहिंग्लज : निलजी येथील श्री हिरण्यकेशी सहकारी शेतीमाल प्रक्रिया संस्था आणि गडहिंग्लज येथील श्री साने गुरुजी शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेकडील थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक सोमवारी गडहिंग्लज तालुक्यात आले होते. यावेळी चर्चेअंती साने गुरुजी पतसंस्थेने थकीत कर्जापोटी ३ लाख ५० हजारांचा धनादेश बँकेला दिला. दुपारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, उपाध्यक्ष अप्पी पाटील, संचालक भैया माने, विलास गाताडे, बाबासाहेब पाटील, सर्जेराव पाटील, संतोष पाटील, आसिफ फरास, कार्यकारी संचालक चव्हाण, व्यवस्थापक डॉ. माने व शिंदे आणि कर्मचाऱ्यांचे पथक गडहिंग्लजला आले होते. ‘साने गुरुजी’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या घरी जाऊन त्यांनी थकीत कर्जासंबंधी चर्चा केली. यावेळी प्रा. कुराडेंनी संस्थेची कैफियत व बाजू मांडली. ते म्हणाले, संस्थेचे २५ लाख रुपये भाग भांडवल स्वरूपात बँकेकडे बिनव्याजी पडून आहेत. बँकेच्या चुकीच्या व्याज आकारणीमुळेच संस्था थकबाकीत गेली आहे. यासंदर्भातील न्यायालयातील प्रलंबित दावे गतीने चालवून निर्णय घ्यावा. मुश्रीफ म्हणाले, ‘साने गुरुजी’चा आणि बँकेचा चार्टड अकौंंटंट एकत्र बसवून थकीत कर्ज प्रकरणाचा हिशेब तपासून घेऊ. त्यानंतर याप्रश्नी चर्चेतून मार्ग काढला जाईल. यावेळी प्रा. अनिल कुराडे, प्रा. आप्पासाहेब पोवार, जे. वाय. बार्देस्कर, शंकर नंदनवाडे, व्यवस्थापक शांताराम मांगले उपस्थित होते. दरम्यान, निलजीचे ‘हिरण्यकेशी’चे संस्थापक अध्यक्ष बी. के. काळपगोळ यांच्या दारात बैठक मारून सनई-चौघडा वाजविला. काळपगोळ यांचा मुलगा प्रशांत यांना गुलाबाचे फूल देऊन थकबाकीची कल्पना दिली. सात कोटींची थकबाकी असून, एकरकमी कर्जफेडीचा लाभ घेऊन परतफेड करावी, अन्यथा मालमत्ता विकून कर्ज भरून घेतले जाईल, याउपरही कर्ज न भागल्यास संचालकांची मालमत्ता विक्रीची कारवाई केली जाईल, असा निरोप वडिलांना सांगण्याची विनंती करण्यात आली. (प्रतिनिधी)
‘गडहिंग्लज’मध्ये ‘केडीसीसी’ची गांधीगिरी
By admin | Published: February 02, 2016 1:12 AM