जिल्ह्यात सर्वच भागात मंगळवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका गांधीनगर व्यापारी पेठेला बसत आहे. व्यापारी पेठेतील गटारी तुंबल्याने पावसाचे पाणी अनेक ठिकाणी रस्त्यावरून वाहत आहे. गणेश टॉकीज, गुरूनानक पेट्रोल पंपजवळ रस्त्यावर पाणी साचून राहिले आहे. वळीवडे कॉर्नर येथे तर गटारीचे पाणी थेट रस्त्याने वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तुंबलेल्या गटारी साफ करून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
चौकट : कर मिळूनही सुविधा देण्यात कुचराई
गांधीनगर बाजारपेठ पाच गावच्या हद्दीत विस्तारली आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना प्रचंड कर मिळतो; पण काही ग्रामपंचायती या व्यापारी पेठेला सुविधा देण्यासाठी कुचराई करत असल्याचे वास्तव आहे.
फोटो ओळ-गांधीनगर मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारी तुंबल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. (छाया बाबासाहेब नेर्ले)