लोकमत न्यूज नेटवर्क
गांधीनगर : गांधीनगर (ता. करवीर) येथील पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच रितू हरेशलाल लालवाणी यांनी बेकायदेशीर बांधकाम न थांबवता उलट त्याला प्रोत्साहन दिल्याच्या कारणावरुन त्यांचे सरपंच आणि सदस्यपद रद्द केल्याचा आदेश पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे. या आदेशाची प्रत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुणे येथील आयुक्त कार्यालयातील अभिलेखापाल यांना देण्यात आली आहे. सनी प्रताप चंदवाणी आणि धीरजकुमार टेहल्याणी यांनी केलेल्या तक्रार अर्जांवर सुनावणी होऊन हा निकाल देण्यात आला आहे. २०१७मध्ये गांधीनगर ग्रामपंचायतीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून रितू लालवाणी या महाडिक गटातून निवडून आल्या होत्या. महाडिक गटाने सरपंच आणि नऊ सदस्य निवडूऩ आणून सत्ता हस्तगत केली होती. गांधीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना बांधकामे सुरु होती. येथील सिसनं १७२६मध्ये अशाचप्रकारचे बांधकाम सुरु असल्याबद्दलचा तक्रार अर्ज सनी चंदवाणी आणि धीरजकुमार टेहल्याणी यांनी सादर केला होता. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २९ जून २०२० रोजी सुनावणी घेऊन कारवाई करण्याचा आदेश सरपंचांना दिला होता. परंतु, सरपंचांनी या बांधकामावर कारवाई करण्यास चालढकल केली. त्यामुळे हे बांधकाम सुरुच राहिले तसेच सिसनं १७२६ हा भूखंड शासनाचा असून, या भूखंडाच्या प्रॉपर्टी कार्डवर तेजूमल टेहलूमल रोहिडा हे भाडेपट्टेदार म्हणून आहेत. या नावात खाडाखोड करुन तेजुमल बदलानी यांनी नोंद केली. तसेच याठिकाणी सुरु असलेल्या बेकायदेशीर बांधकामावर योग्य कारवाई न केल्यामुळे तसेच त्यांना प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाल्याने सरपंच रितू लालवाणी यांना सरपंच तसेच सदस्य पदावरुन दूर करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला.
कोट : मी गांधीनगरची पहिली लोकनियुक्त महिला सरपंच असताना गावामध्ये अनेक विकासकामे चांगल्याप्रकारे करत आहे. माझ्या या कामाची दखल घेऊन अनेक संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत. राजकीय व्देषापोटी माझ्यावर सूडबुध्दीने विरोधक कारवाईसाठी प्रयत्न करत आहेत. बेकायदेशीर बांधकामांना फक्त सरपंचच नव्हे तर इतर सर्व सदस्य आणि ग्रामविकास अधिकारीही तितकेच जबाबदार असताना फक्त माझ्यावरच कारवाई झाली आहे. या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. - रितू लालवाणी.