कामेरी : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील येडेनिपाणी-इटकरे फाट्याजवळील उड्डाणपुलावरून २५ ते ३० फूट खाली मोटार कोसळून सासरे-सून जागीच ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. रामचंद्र गुरुनोमल वधवा (वय ६५), भावना मनोज वधवा (३५, सर्व रा. गांधीनगर, कोल्हापूर) यांचा मृतांमध्ये समावेश आहे, तर मनोज रामचंद्र वधवा (३५), मोहित मनोज वधवा (९), महेक मनोज वधवा (१३), अश्विनी वधवा (१५, सर्व रा. गांधीनगर, कोल्हापूर) गंभीर जखमी आहेत. गांधीनगर येथील वधवा कुटुंबीय बुधवारी (दि. १ जून) पहाटे मोटारीतून (एमएच 0८ आर ५६७८) उरळीकांचन येथे देवदर्शनासाठी निघाले होते. मनोज वधवा स्वत: गाडी चालवीत होते. त्यांच्यासोबत वडील रामचंद्र वधवा, पत्नी भावना वधवा, मुले महेक आणि मोहित व भाची अश्विनी हेही देवदर्शनासाठी निघाले होते. वधवा यांची मोटार इटकरे-येडेनिपाणी फाट्यानजीकच्या उड्डाणपुलाजवळ आली असता त्यांच्या गाडीच्या आडवे कुत्रे गेले. त्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मनोज वधवा यांचा मोटारीवरील ताबा सुटला. यामुळे मोटार उड्डाणपुलावरून २५ ते ३0 फूट खाली असलेल्या सेवारस्त्यावर कोसळली. यामध्ये रामचंद्र वधवा, भावना वधवा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. इतर चौघे गंभीर जखमी झाले. यामध्ये मोटारीचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी जखमींना तत्काळ बाहेर काढून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात झाली आहे. (वार्ताहर)
गांधीनगरचे सासरा-सून येडेनिपाणीजवळ ठार
By admin | Published: June 02, 2016 1:07 AM