Ganesh Chaturthi 2018 : विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिका यंत्रणा सज्ज, नदीत मूर्ती विसर्जन न करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 04:30 PM2018-09-21T16:30:15+5:302018-09-21T16:34:37+5:30
कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने महानगरपालिका प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेश विसर्जन सोहळा व्यवस्थित पार पडण्याकरिता ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागत होत्या, त्यांची पूर्तता झाली आहे.
कोल्हापूर : शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने महानगरपालिका प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेश विसर्जन सोहळा व्यवस्थित पार पडण्याकरिता ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागत होत्या, त्यांची पूर्तता झाली आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांसह सुमारे ४०० कर्मचारी आवश्यक त्या यंत्रांसह विसर्जनाच्या प्रक्रियेत मंडळाच्या कार्यकर्त्यांना मदत करणार आहेत. दरम्यान, गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये न करता इराणी खणीमध्ये करावे; तसेच विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध व डॉल्बीमुक्त करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
रविवारी निघणाऱ्या विसर्जन मिरवणूक मार्गावरील सर्व रस्त्यांची डागडुजी करण्यात येत आहे. निश्चित केलेल्या विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबूची व आवश्यकतेनुसार लोखंडी बॅरिकेट्स व वॉच टॉवर उभी करण्यात आली आहेत. ड्रेनेज लाईनमधील अडचणी दूर करण्यात येत आहे. विसर्जन मार्गावरील सर्व अडथळे व अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. मिरवणूक मार्गावरील अडथळा ठरत असलेल्या झाडांच्या फांद्याही छाटण्यात आलेल्या आहेत.
मिरवणूक मार्ग व विसर्जनाच्या ठिकाणी प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे.
पंचगंगा नदीघाट, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव, पंचगंगा नदी बापट कॅम्प येथे दान करण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती ठेवण्यासाठी मंडप उभारण्यात आलेला आहे. इराणी खणीवर सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी दोन जे. सी. बी. यंत्रांची व्यवस्था ठेवण्यात आलेली आहेत. तसेच इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरिकेटिंग करण्यात आले असून, वॉच टॉवर व पोलीस पेंडल उभे करण्यात आलेले आहेत. मिरवणूक मार्ग व मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत.