संतोष मिठारीकोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयजयकार, पारंपारिक वाद्यांचा गजर आणि भाविकांच्या गर्दीमध्ये कोल्हापुरात रविवारी साडेचारपर्यंत २५० ’ ‘बाप्पांना’ निरोप देण्यात आला.
कोल्हापुरातील बहुतांश मंडळांनी मोठ्या आवाजाच्या ‘साऊंड सिस्टीम’ला बगल देत पारंपारिक वाद्यांना पसंती दिली. अबालवृद्धांचा सहभाग, कार्यकर्त्यांचा जल्लोष अशा उत्साही वातावरणात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक रंगली. सकाळी नऊ ते दुपारी चार या पहिल्या टप्प्यात मिरवणूक वेगाने पण, शांततेत पुढे सरकत राहिली.कोल्हापूरच्यागणेश विसर्जन मिरवणूकीस मंगळवारी सकाळी नऊ वाजता मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘ श्री’ चे पालखी पूजन व आरतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खासबाग मैदान येथे हस्ते झाला. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, आदी उपस्थित होते.
या मिरवणुकीच्या प्रारंभावेळी महापौरांसह काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना सुरक्षा यंत्रणेतील पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याने खासबाग मैदान ते मिरजकर तिकटी या मिरवणूक मार्गावरील वातावरण काहीवेळ तणावपूर्ण बनले होते. यावर पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाच्यावतीने दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर येथील वातावरण निवळले.
खासगाब मैदान, मिरजकर तिकटी, कोळेकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, शिवाजी चौक, ताराबाई रोड या मार्गावरून मंडळे मुख्य मिरवणूक मार्गावर दाखल होत होती. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’, ‘मोरया मोरया’चा जयजयकार, ढोल-पथकाचा दणदणाट, हलगी-खैताळावरील लेझीम, झांजपथक, धनगरी ढोल अशा पारंपारिक वाद्यांचा गजर, शासनाच्या नियमानुसार लावलेल्या ‘साऊंड सिस्टीम’वरील गीतांच्या तालावर नृत्य करणारे कार्यकर्ते, अशा वातावरणात मिरवणूक पुढे सरकत राहिली.
या मिरवणुकीत युवती, महिला मोठ्या उर्त्स्फूतपणे सहभागी झाल्या. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी प्रशासन, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांकडून मंडळांना मानाचे श्रीफळ, पानसुपारी देण्यात येत होती. दुपारी चारपर्यंत मिरवणूक वेगाने पुढे सरकत राहिली.
लेसर शो, लाईट शो असणाऱ्या मोठ्या मंडळांनी सायंकाळी मिरवणुकीत सहभागी होण्याचे ठरविले होते. त्यामुळे दुपारी चारनंतर मिरवणुकीचा वेग काहीसा मंदावला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मिरजकर तिकटी, ताराबाई रोड परिसरात लेसर शो असणाऱ्या मंडळांनी मिरवणुकीत प्रवेश करण्यास सुरूवात केली.
साडेचारपर्यंत २५० मूर्तींचे विसर्जनपंचगंगा नदीमध्ये दुपारी साडेचार वाजेपर्यंत २५० मूर्तींचे विसर्जन झाले. काही मंडळांनी पर्यावरणपूरक विसर्जनाचा निर्णय घेतला. अशा मूर्तींची संख्या २४४ इतकी होती.