तानाजी पोवारसाऱ्यांची दु:खे घालविणारा विघ्नविनाशक, विघ्नहर्ता, संकटमोचन अशा विविध नावांची रूपे लाभलेला, शांती नांदविणारा व मंगलमयतेचे प्रतीक म्हणून श्री गणरायाची आराधना केली जाते. प्रचंड ऊर्जेची विविध रूपेही त्याच्यात प्रकटली आहेत. या बाप्पांच्या उत्सवात बालकापासून बड्यापर्यंतचा सहभाग. घरात मंगलमय वातावरण तयार करण्यासाठी साºया घराची सजावट होते. चौकातील मंडळे तर वर्गणी जमा करण्यात भलतीच माहीर! लाखो रुपये वर्गणी जमा होते.
उत्सवातील रोजचे नियोजन ठरते, ते म्हणजे बड्या वर्गणीदारांकडून आरती करण्याचे. आता प्रश्न राहतो तो खर्चाचा. मग काय, ज्याचे वर्चस्व तोच ठरवितो खर्चाचे नियोजन. त्यात भविष्यातील राजकीय स्वार्थ असतोच; पण ज्याचे वजन जास्त त्याची चलती, या म्हणीप्रमाणे उत्सवाचे नियोजन होते. पोरे गोळा करायची आहेत, मग लावा साउंड सिस्टीम, छान वाटणारा पण डोळे चुरचुरणारा लावा लाईट इफेक्ट अन् त्यासाठी होतो कोट्यवधींचा खर्च; पण जनजागृतीबाबत हाती मात्र शून्यच....!
आता ‘तो’ कोल्हापूरचा राजा, तो आमच्या पेठेचा राजा, तो आमच्या परिसराचा राजा... असे प्रत्येक मंडळाचे ‘राजे’ झळकू लागले; पण साºयांचा सुखकर्ता असणाºया या बाप्पाला ‘राजा’ संबोधून मंडळांनी त्याला संकुचित वलयामध्ये आखडून ठेवलंय. शास्त्रात म्हटल्याप्रमाणे साºया विश्वाला शांती देणारा, त्याची काळजी करणाराच राजा असतो. त्याप्रमाणे हा सुखकर्ता साºयांचाच राजा आहे. माझा बाप्पा भारी की तुझा... ही स्पर्धाच निरर्थक. त्यातून बाप्पाची विविध रूपे पाहायला मिळताहेत. आता तर त्या पलीकडे जाऊन बाप्पाच्या या उत्सवावर मुंबई, दिल्लीचा प्रभाव दिसतोय.
‘मुंबईचा बाप्पा लई भारी, दिल्लीचा देखावा जगात भारी,’ असा नवा ट्रेंड येऊ लागलाय. सण मंगलमय असला तरी कार्यकर्त्यांची दु:खे घालविणारा अन् बड्या व्यापाºयांना बड्या रकमेच्या पावत्यांचे विघ्न वाटणारा ठरत आहे. संपूर्ण उत्सवावर खर्चाची कोट्यवधींची उलाढाल ठरलेलीच; पण जागृती किती? हाही प्रश्न उभारतोच. उत्सवाच्या निमित्ताने युुवकांसमोर विविध विषय जागृतीसाठी समोर यावेत. त्यातून कोवळ्या मनाचे तसेच भरकटलेल्यांचे परिवर्तनही महत्त्वाचे; पण मंडळाकडून लाखो रुपये खर्च करताना ‘जागृती’ हा विषय तसा मागेच पडतोय.
भव्य महाल, गुहा, डोळ्यांना इजा करणारा लाईट इफेक्ट, हिडीस नृत्य यांवर लाखो रुपये खर्च पडत आहेत. पाच वर्षांपूर्वी हे जागृतीचे काही विषय पुढे आले; पण त्यांना शासकीय पाठबळ मिळाले नाही, तसे ते मागे पडले व पुन्हा कार्यकर्ते मळून दिलेल्या वाटेवरून वाटचाल करू लागले. आज बाप्पाला ‘हा आमच्या पेठेचा राजा’ म्हणताना, त्याला शाही थाटात ठेवण्याची तसेच किमान मंडप परिसरातील रस्ते उखडताना भान ठेवण्याची निर्माण झाली गरज आहे.
एखादा मंत्री रस्त्याने निघाला तर तो रस्ताही नवा होतो; पण आता बाप्पाला ‘राजा’ म्हणून संबोधताना या मंडळांच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर पाडलेल्या खड्ड्यातूनही जावे लागते. कोल्हापूरला कलेचे माहेरघर संबोधले जाताना बाहेरील कलाकारांची वाहवाच अनाठायी का? आज मुंबईहून बाप्पा येऊन कोल्हापूरच्या मंडपात विराजमान होऊ लागले, तर दिल्लीत स्वातंत्र्यदिनी रस्त्यांवर उतरलेले महाराष्टÑाचे चित्ररथही बाप्पाला घेऊन शाही थाटात कोल्हापूरच्या रस्त्यांवर धावू लागले आहेत; पण जगाचा सुखकर्ता म्हणून संबोधल्या जाणाºया या बाप्पाराजाची शाही मिरवणूक कोल्हापूरच्या खड्ड्यांतील रस्त्यांवरून जाताना बाप्पाला झुलके देत यावे लागत आहे अन् अनंत चतुर्दशीला कानठळ्या बसणाºया वाद्यांत व डोळे दुखविणाºया लेसर लाईटवर लाखो रुपये खर्च करूनही पायघड्या न घालता खड्ड्यातूनच विसर्जनसाठी जावे लागते.
उत्सवावर कोट्यवधी रुपयांचा अनाठायी खर्च केला; पण साºया धामधुमीत काही मोजक्यांनाच विधायकतेची जाणीव राहते. बाकींना विधायकता म्हणजे काय? हे सांगण्याची गरज आहे. अवाढव्य उंचीच्या बाप्पासह मिरवणूक, डोळे दुखणारे लाईट इफेक्ट, साउंड सिस्टीमवर कोट्यवधींची उधळपट्टी हात राखून करावी; पण त्याचा समाजासाठी किती लाभ, जनजागृती किती? हाही प्रश्न उत्सवाच्या शेवटी पडतोच. आता धामधुमीवरच पैसे संपले. मग विधायक कार्याचे नियोजन करू पुढील वर्षीच... मग त्यासाठी हाक द्यावी लागते, ‘पुढच्या वर्षी लवकर या...!’