Ganesh Chaturthi कोल्हापूर : उत्सवातील लोकोपयोगिता-- सुखकर्ता दु:खहर्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:17 AM2018-09-22T00:17:37+5:302018-09-22T00:21:47+5:30
उद्या, रविवारी गणपती बाप्पा आपल्या गावाला चाललेत. गेल्या आठ-नऊ दिवसांपासून पृथ्वीतलावरील आगत-स्वागत, आवडत्या खीर-मोदकांसह पंचपक्वान्नांच्या भोजनानं तृप्त होऊन जाताना त्यांना नक्कीच आनंद झालाय.
भारत चव्हाण
उद्या, रविवारी गणपती बाप्पा आपल्या गावाला चाललेत. गेल्या आठ-नऊ दिवसांपासून पृथ्वीतलावरील आगत-स्वागत, आवडत्या खीर-मोदकांसह पंचपक्वान्नांच्या भोजनानं तृप्त होऊन जाताना त्यांना नक्कीच आनंद झालाय. भाविकांच्या आदरातिथ्याने ते चांगलेच भारावून गेलेत. सुरुवातीला कैलास पर्वतावरून पृथ्वीतलावर यायला बाप्पा नाहीच म्हणत होते. इथला डॉल्बी, कर्णकर्कश गाणी, अस्ताव्यस्त मंडप, तरुणांचा धिंगाणा यांमुळे बाप्पा काहीसे नाराज होते; पण पार्वती व शंकरांनी त्यांची समजूत काढली आणि त्यांनी येथे येण्याचा निर्णय घेतला.
आता जाताना मात्र ते जाम खुश आहेत. दिवसेंदिवस गणेशाचा उत्सव साजरा करताना सामाजिक जाणिवा तीव्र होत असल्यामुळे काही सुधारणा नक्कीच होताना दिसत आहेत. नो साउंड सिस्टीम, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य, समाजप्रबोधन, जनजागृती, सार्वजनिक स्वच्छता अशा काही चांगल्या प्रथा आता नव्याने आकार घेत आहेत. अजूनही बऱ्याच सुधारणा अपेक्षित असल्या तरी त्याची सुरुवात मात्र नक्की झालीय; म्हणूनच बाप्पा सर्वांचा निरोप घेताना खुश आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळातील गणेशोत्सव आणि आत्ताचा गणेशोत्सव यांत बराच मोठा बदल झाला आहेत. साधेपणातून भव्यतेकडे वाटचाल करणाºया उत्सवाने समाजातील खूप मोठे अर्थशास्त्र निर्माण केले आहे. खरेदी-विक्रीच्या निमित्ताने चलनाची चलती राहते. मोठ्यातील मोठ्या व्यापाºयापासून छोट्यातील छोट्या विक्रेत्याला, श्रमिकापासून मंडप उभारणी करणाºया ठेकेदारापर्यंत, फळविक्रेत्यापासून मिठाई विक्री करणाºया व्यापाºयापर्यंत आणि वाजंत्र्यापासून साउंड सिस्टीमवाल्यापर्यंत चार पैसे मिळविण्याची संधी उत्सवातून निर्माण झालीय. त्यामुळे समाजातील एका ठिकाणी अडकलेला पैसा हा व्यापारी चक्रानुसार फिरत राहतो. अर्थव्यवस्थेला गती मिळत राहते. कोल्हापूर शहरात गणेशोत्सव साजरा करणारी साधारणपणे हजार-बाराशे मंडळे आहेत. जिल्ह्णातील मंडळांचा हा आकडा सात ते आठ हजारांपर्यंत असू शकतो. लोकवर्गणी हाच या सर्व मंडळांचा आर्थिक स्रोत असतो. सरासरी एका गणेशोत्सव मंडळाची वर्गणी किमान दोन लाख रुपये धरली तर शहर पातळीवर २४ ते २५ कोटी रुपये आणि जिल्ह्णाच्या पातळीवर किमान १२० ते १२५ कोटी रुपयांची वर्गणी जमा होते. दोन्ही मिळून हा आकडा १४५ ते १५० कोटींच्या आसपास जातो. हा सगळा पैसा जनतेतून उभा राहतो आणि खर्चही जनतेतच होतो. यातील काही पैसे हे गणपतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांत गुंतून राहतात. बाकीच्या पैशांची अक्षरश: उधळपट्टी होते; कारण मंडळांची शिल्लक तुलनेने शून्य असते.
पर्यावरणपूरक, साउंड सिस्टीमविरहित गणेशोत्सव, धार्मिक वातावरणातील गणेशोत्सव साजरा करण्याची जी जनजागृतीची मोहीम आपण हाती घेतली आहे, तिचे सुपरिणाम दिसायला सुरुवात झालीय. म्हणूनच आता गणेशोत्सवातील जमा होणाºया वर्गणीतील किमान दहा ते पंधरा टक्के निधी हा समाजकार्यावर खर्च झाला पाहिजे, याकरिता आग्रह धरण्याची किंवा मंडळांना दिशा दाखविण्याची गरज निर्माण झालीय. अशा सार्वजनिक निधीतून उभं राहणारं कार्य अलौकिक तर असेलच; शिवाय त्यातून गरजू, अपेक्षितांना मदत झाल्याचा आनंदही मोठा असेल.
आता तुम्ही म्हणाल... आम्ही महाप्रसाद घालतोच की... पण या महाप्रसादाचा लाभ कोण घेतो? ज्यांचं पोट भरलेलं आहे असेच घेतात. गोरगरीब, गरजू लोक यापासून लांबच राहतात. मग याला सामाजिक कार्य म्हणायचं का? ज्यांची पोटं भरणं कठीण आहे, अशा अनाथ मुलांची जर या मंडळांनी वर्षभर पोटं भरली तर त्यासारखं पवित्र कार्य दुसरं कोणतंही असू शकणार नाही. सध्याची परिस्थिती अतिशय कठीण बनलीय. शिकण्याची इच्छा असूनही महागड्या शिक्षणामुळे अनेक गरीब मुलं शाळा, महाविद्यालये अर्धवट सोडून देतात. विद्वत्ता असूनदेखील पुढील अभ्यासक्रम पूर्ण करणे अशक्य असल्याने मुले नोकरीसाठी धडपडत राहतात.
अशा गरजू मुलांना शिक्षणाच्या बाबतीत मदत केली तर किती मोठे उपकार होतील? अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत असते. अशा रुग्णांसाठी रक्तदानाची चळवळ गणेशोत्सवाच्या निमित्ताने उभी केली तर किती रुग्णांचे प्राण वाचतील? आज सर्वत्र सिमेंटची जंगलं उभी राहत आहेत; त्यामुळे वृक्षांची कत्तल होत आहे. या उत्सवात प्रत्येकमंडळाने त्याच्या परिसरात किमान दहा वृक्ष लावून त्यांच्या जतनाची जबाबदारी घेतली तरी किती मोठी सावली मिळेल? कल्पना छोट्या-छोट्या असल्या तरी सहजशक्य तसेच अनुकरणीय आहेत. त्यातून मोठं सामाजिक कार्य उभं राहू शकतं. म्हणूनच बाप्पाला निरोप देताना अशा लोकोपयोगी कार्याचा शब्दही द्यावा लागेल.