कुरुंदवाड : क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शहरातील खेळाडूंनी शहराचे नाव सातासमुद्रापार केले आहे. आता खेळाडूंबरोबर येथील गणपतीबाप्पाही जर्मनीला जाण्यासाठी रवाना झाला आहे. त्यामुळे येथील संस्कृती आणि कुंभारांच्या कौशल्याचा जर्मनवासीय आनंद घेणार आहेत.
भारतीय संस्कृतीचे जगभरात कौतुक करत त्याच्या अनुकरणासाठी अनेकजण उत्सुक असतात. देशभरात गणेशोत्सव सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. परदेशात शिक्षण, वास्तव्याला असलेल्या भारतीयांना गणेशोत्सव आणि गणपतीबाप्पांची भुरळ पडत असते. शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील अनिल वसंत खोत हे जर्मनीत कंपनीत नोकरीला आहेत. गणेशोत्सव जवळ आल्याने जर्मनीतील घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी आकर्षक गणेशमूर्ती बनविण्यात हातखंडा असलेले येथील मूर्तिकार बाबासाहेब कुंभार यांच्याकडे त्यांनी मूर्ती बनविण्यासाठी एक महिन्यापूर्वीच ऑर्डर दिली होती.
खोत यांच्या पत्नी अनिता यांचे माहेर कुरुंदवाड येथील भैरववाडी आहे. शुक्रवारी सकाळी त्या आपल्या मुलांसह गणपतीबाप्पाला घेऊन जर्मनीला रवाना झाल्या आहेत. चौदा तासांचा विमान प्रवास करुन बाप्पा जर्मनीत पोहोचणार असल्याने जर्मनीतही बाप्पाच्या स्वागताबरोबरच कुरुंदवाडचे मूर्तिकार कुंभार यांच्या कलेचाही कौतुक होणार आहे.
फोटो - १३०८२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - कुरुंदवाड येथील मूर्तिकार बाबासाहेब कुंभार यांनी जर्मनीला पाठवलेली आकर्षक गणेशमूर्ती.