-तरीही गर्दी झालीच .....
इराणी खणीवर गर्दी टाळण्यास पोलिसांना यश मिळाले. परंतु मंडळापासून गणेश मूर्ती सोबत इराणी खणीकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गर्दीवर नियंत्रण राखता आले नाही. शिवाजी चौकातील २१ फुटी गणेश मूर्ती जशी बाहेर पडली आणि ती पाहण्यासाठी जी गर्दी झाली हटली नाही. शहरातील सात ते आठ मंडळांचे कार्यकर्ते दोनशे ते पाचशेच्या संख्येने विसर्जनासाठी आले होते. पण पोलिसांची तीन फळ्या भेदता न आल्याने कार्यकर्ते आल्या मार्गी निघून गेले.
- दक्ष अधिकारी, तत्पर सेवा -
महानगरपालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त अधीक्षक तिरुपती काकडे, शहर उपाधीक्षक मंगेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औधकर, संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले आदी वरिष्ठ अधिकारी विसर्जन प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. मार्गदर्शन करत होते. शेवटची मूर्ती विसर्जित झाली तेव्हाच त्यांनी आपल्या जागा सोडल्या.
-मूर्तीस दुग्धाभिषेक-
श्रींच्या मूर्तीस शाहूनगर दत्त मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी इराणी खणीवर माजी उपमहापौर विक्रम जरग यांच्या हस्ते तसेच शाहू सैनिक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडळाच्या दारातच दुग्धाभिषेक केला.
-शेवटची मूर्ती मध्यरात्री विसर्जित-
रविवारी मध्यरात्री एक वाजता शेवटची व्हाईट आर्मी या स्वयंसेवा संस्थेची मूर्ती विसर्जित झाली. त्याआधी अवनी व एकटी संस्थेची मूर्ती विसर्जित झाली. यावेळी प्रशासक कादंबरी बलकवडे व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या उपस्थितीत आरती झाली. आरतीची मान उपशहर अभियंता एन. एन. पाटील यांना मिळाला.
- खाद्यपदार्थांच्या गाड्या बंद -
इराणी खणीच्या भोवती खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरु ठेवण्यास पोलीस प्रशासनाने पूर्णपण मज्जाव केला होता. खाद्यपदार्थ घेण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे खणीच्या परिसरात साधा चहाही मिळत नव्हता.