कोल्हापूर चोवीस तास उलटून गेले तरी कोल्हापूरमध्ये अजूनही गणेश विसर्जन मिरवणूक सुरूच आहे. सकाळी ११ पर्यंत १००३ मूर्तींचे विसर्जन झाले असून अजूनही ८० मूर्तींचे विसर्जन बाकी आहे. शुक्रवारच्या रात्री १२ वाजता काही ठिकाणी पोलिसांनी साऊंड सिस्टिम बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. यावरूनच पापाची तिकटी परिसरात वादावादी झाली. यावेळी किरकोळ लाठीचार्जही करावा लागला. एका तालमीच्या गणपतीला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करताना पोलिसांनाही धक्काबुक्की झाली.
पहाटे पाचच्या सुमारास जिथे आहेत तेथे गणपती ठेवून कार्यकर्त्यांनी विश्रांती घेणे पसंत केले. सकाळी सहानंतर पुन्हा डीजे लावून कार्यकर्त्यांनी नाच सुरू केला. त्यामागेही मिरवणुकीत अनेक मंडळे होती. अखेर सकाळी ११ वाजता या मार्गावरचा शेवटचा भगतसिंग फ्रेंडस सर्कलाचा गणपती मार्गस्थ झाला. यानंतर दोन तासांनी तो विसर्जन स्थळी जाईल.