एकनाथ पाटील
कोल्हापूर - कोल्हापूरच्यागणेश विसर्जन मिरवणुकीला रविवारी (23 सप्टेंबर) सकाळी नऊ वाजता मिरजकर तिकटी येथून प्रारंभ झाला. पालमंत्री चंद्रकांत पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापूरचा मानाचा गणपती तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीच्या पुजनाने मिरवणुकीला सुरुवात झाली. दरम्यान पालकमंत्री व पोलीस अधीक्षकांच्या सुरक्षा यंत्रणेने महापौरांसह वृत्तपत्राच्या छायाचित्रकारांना धक्काबुक्की केल्याने गोंधळ उडाला. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यावर नागरिकांची दूतर्फा गर्दी होत आहे. बहुतांशी सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत पारंपारीक वाद्यांचा वापर केला आहे. धनगरी ढोल-ताशे, हालगीच्या तालावर लेझीम खेळणाऱ्या महिला, झांझपथकांनी मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदीर, महालक्ष्मी चौक, महाद्वाररोड, पापाची तिकटी, गंगावेश, पंचगंगा नदी घाटापर्यंत गणपती बाप्पा मोरया...चा जल्लोष दिसत आहे. नऊवारी साड्या परिधान केलेल्या महिला मिरवणूकीत अग्रभागी आहेत. बालकांपासून अबालवृध्दापर्यंत सर्वजण मिरवणूकीत सहभागी झाले आहेत.
महापालिकेसह विविध पक्षांनी स्वागत मंडप उभे केले आहे. येथून पुढे जाणाऱ्या प्रत्येक मंडळाचे मानाचे श्रीफळ व पानाचा विडा देवून त्यांचे स्वागत केले जात आहे. मिरवणूक शांततेत पुढे ढकलण्याचे काम पोलीस करीत आहेत. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदीर, महालक्ष्मी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, पंचगंगा नदी घाट आदी ठिकाणी पोलीस उपअधीक्षकांसह १०० ते २०० पोलीसांचा फौजफाटा तैनात केला आहे. सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मिरवणूकीमध्ये बंदोबस्ताचे काम करीत आहेत. पापाची तिकटी ते गंगावेश रस्त्याच्या मध्यभागी दोरखंड बांधून पोलीस गर्दीचे नियंत्रण करीत आहेत. पापाची तिकटी येथे रविवार पेठेतील गणेश मंडळ येताच ट्रॅक्टर पुढे-मागे घेण्यावरुन त्यांची समोरच्या मंडळांच्या कार्यकर्त्यांशी वादावादी होवून धक्काबुक्की झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत वाद मिटवला.
दूपारी चारनंतर मिरवणुकीला रंगत
मिरवणुकीला दूपारी चारनंतर रंगत चढणार आहे. प्रसिध्द मंडळांच्या गणेशमूर्ती या दरम्यान मिरवणूक मार्गावर येणार आहेत. या मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीवर पोलिसांनी बारकाईने नजर ठेवली आहे.
साऊंन्ड सिस्टिम जप्त
कसबा बावडा येथे शनिवारी मध्यरात्री साऊंन्ड सिस्टिम टॅम्पोमधून घेवून जात असताना शाहुपूरी पोलिसांनी जप्त केली. दोन मंडळे ही सिस्टिम ऐनवेळी मिरवणुकीत आणण्याच्या तयारीत होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असलेची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.