-‘लेटेस्ट’कडून मास्कचे वाटप -
सजीव देखावे सादर करण्यात सुपरिचित असलेल्या लेटेस्ट तरुण मंडळाची गणेश मूर्ती साधेपणाने विसर्जनासाठी नेण्यात आली. कार्यकर्ते केवळ टाळ्यांचा गजर करत होते. ज्या मार्गावरुन मूर्ती नेण्यात आली तेंव्हा कार्यकर्त्यांनी मास्कचे वाटप केले.
दुपारपर्यंत संथ गती, सायंकाळी मोठी गर्दी -
रविवारी सकाळी सात वाजल्यापासून विसर्जन सुरु झाले होते. परंतु दुपारी तीनपर्यंत विसर्जनाची गती अगदीच संथ होती. त्यानंतर मात्र मंडळांनी गर्दी केली. रात्री आठ वाजता तर इराणीखणीपासून देवकर पाणंदपर्यंत व सानेगुरुजी वसाहतपर्यंत मोठ्या संख्येने मंडळे आली. त्यांना रांगेत उभे राहावे लागले. पण खणीवर प्रवेश मिळाला की पाच ते सहा मिनिटात विर्सजन होत होते.
-बारा तराफे, अठरा तास सेवा -
महापालिकेने विसर्जनाची उत्तम सोय केली होती. एकाच वेळी बारा तराफे आणि त्या बारा तराफ्यांवर महापालिकेचे पाच, तर माथाडी कर्मचारी सात असे बारा कर्मचारी नेमले होते. अखंड अठरा तास या पथकाने काम केले. याशिवाय एक क्रेन, दोन स्वयंचलित यंत्रे विसर्जनाचे काम करत होती. त्यामुळे विसर्जन सहज सुलभ झाले. याशिवाय मंडळांना दान केलेल्या मूर्ती आणण्यासाठी ९० वाहने व कर्मचारी नियुक्त केले होते.
- फुलांच्या पायघड्या, रंगीबेरंगी रांगोळ्या -
मिरवणुकीला बंदी असल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक मिरवणुकीचा मोह टाळला. परंतु कार्यकर्त्यांनी आपल्या मंडळाच्या दारातून पुढे काही अंतरापर्यंत फुलांच्या पायघड्या, रंगीबेरंगी रांगोळ्या रेखाटून तसेच लेझीम, ढोल, ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप दिला. मंडळाच्या परिसरातील महिलाही यावेळी उपस्थित असल्याचे सर्वत्र पाहायला मिळत होते. परंतु पुढे विसर्जनास जाताना कोणतीही वाद्ये आणली नाहीत.
- फक्त टाळ्या आणि मोरयाचा गजर ...
वाद्ये आणि संगीताच्या ठेक्याशिवाय निघालेल्या गणपती बाप्पासमोर मंडळांच्या कार्यकर्त्यांनी फक्त टाळ्यांचा तसेच मोरया...चा गरज केला. मूर्ती विसर्जनासाठी मर्यादित कार्यकर्त्यांनी बाहेर पडावे, ही अट मात्र कोणत्याही मंडळांना पाळता आली नाही. ‘तू येऊ नको’ असं कोणी कोणाला सांगायचं असं म्हणून जे येतील त्यांना घेऊन कार्यकर्ते विसर्जनास बाहेर पडले. परंतु पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे इराणी खणीवर केवळ पाच ते सात कार्यकर्तेच जाऊ शकत होते.