कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीतील मिरजकर तिकटी ते पापाची तिकटीपर्यंतचा संपूर्ण मार्ग मंडळांनी तासभरात पूर्ण करण्याचे बंधनकारक असून, त्यादृष्टीने नियोजन केल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. साउंड सिस्टीमसह मिरवणूक मार्गातील वेळेची मर्यादा मंडळांनी पाळावी, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी पोलीस प्रशासन व मंडळांचे कार्यकर्ते यांची बैठक झाली. बैठकीत मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विविध सूचना मांडल्या. क्षीरसागर यांनी, मर्यादित आवाजाचा साउंड सिस्टीम असावा, तो ठरल्या वेळेत बंद करावा, शरीराला अगर मोबाइलला इजा पोहोचविणारा लेसर सिस्टीम मंडळांनी वापरू नये, असे आवाहन करत महापालिकेने आपली यंत्रणा अधिक सक्षम करावी, मंडळांनी संपूर्ण मिरवणूक मार्ग तासभरात पूर्ण करून पुढे जावे, असेही आवाहन तालीम संख्या व मंडळांना त्यांनी केले.
बैठकीत, अपर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, गृह पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व पोलीस निरीक्षक तसेच शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुजीत चव्हाण, शहरप्रमुख जयवंत हारुगले, शिवाजी जाधव, देवस्थानचे माजी अध्यक्ष महेश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
समांतर मार्गाचा ८० मंडळांकडून स्वीकार
महाद्वार रोड या मुख्य मार्गाला बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक ते पापाची तिकटी हा समांतर मार्ग असून, या मार्गावरही आपुलकीचे स्वागत कक्षही उभारण्यात येतील. ८० मंडळांनी समांतर मार्ग स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.
साउंड सिस्टीम, लेसर शोची तीव्रता तपासणार
साउंड सिस्टीम ‘डेसिबल’ यंत्राद्वारे तपासणार आहेच; पण डोळ्याला व शरीराला गंभीर इजा पोहोचविणाऱ्या लेसर शोची तीव्रता तपासणीचे यंत्र उपलब्ध नसल्याने डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी होणार आहे.
वाद वाढविणाऱ्या मंडळांवर कारवाई
मिरवणुकीत जाणीवपूर्वक वाद निर्माण करणाऱ्या मंडळावर कारवाई व त्यांना मुख्य मिरवणुकीत लवकर प्रवेश मिळणार नाही.
धोकादायक इमारती निर्मनुष्य करणार
मुख्य मिरवणूक मार्गावरील सर्व धोकादायक इमारतींना मिरवणूक संपेपर्यंत निर्मनुष्य करण्यात येणार आहेत. त्याबाबत नियोजन सुरू आहे. त्यांच्या निवासाची दिवसांची व्यवस्था महापालिका करणार आहे. इमारतीतील रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत.
वाहनासाठी ‘आरटीओ’चे प्रमाणपत्र
मिरवणुकीतील मंडळांची वाहने ‘आरटीओ’कडून तपासून त्याबाबतचे सुस्थितीतचे प्रमाणपत्र पोलिसांना देणे बंधनकारक असल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांंगितले.