कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदाही रात्री बारानंतर मंडळांचा आवाज बंदच राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्पष्ट केले. बिनखांबी गणेश मंदिर ते गंगावेश या मार्गावर रात्री आठ ते ११ या वेळेत प्रचंड गर्दी असते. ही गर्दी टाळण्यासाठी मार्गावर ठिकठिकाणी 'एक्झिट वे' तयार करणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. पंडित यांच्यासह अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. १०) दुपारी मिरवणूक मार्गाची पाहणी करून गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या.गणेश आगमन मिरवणुकीत रात्री बाराला ध्वनियंत्रणा बंद करून वेळेत मिरवणूक आटोपण्याचे काम पोलिसांनी केले. हाच नियम विसर्जन मिरवणुकीतही कायम राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक पंडित यांनी स्पष्ट केले. तसेच मिरवणूक मार्गावर ठाण मांडून मागील मंडळांना अडथळा करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अधीक्षक पंडित यांच्यासह शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके आणि शहरातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. विशेषत: मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी, गंगावेश या मार्गाची पाहणी केली. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना बाहेर पडण्यासाठी 'एक्झिट वे' तयार करण्याच्या सूचना अधीक्षकांनी दिल्या. गर्दीवर नजर ठेवण्यासाठी सहा ठिकाणी सुरक्षा मनोरे उभारले जाणार आहेत. मार्गावर येणा-या आणि जाणा-या नागरिकांना दोन्ही बाजूने स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. मिरवणूक मार्गालगत फेरीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना थांबण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती अधीक्षकांनी दिली.
कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री बारानंतर आवाज बंद म्हणजे बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 3:12 PM