अनिल पाटीलसरुड : सरूड ते गणपतीपुळे हे अंतर आहे तब्बल १२५ किलोमीटरचे. आंबा घाटातील वेडीवाकडी वळणे,चढउताराचा रस्ता आणि सोबतीला ऊन, वारा, पाऊस, दाट धुके एकंदरीत ही तशी अवघड वाट. पण हीच अवघड वाट सुभाष कुंभार या सरुडच्या गणेशभक्ताला खूप सोपी वाटते. अंगारकी संकष्टी आली की सरुडच्या या गणेशभक्ताची पावले आपोआप वळतात ती गणपतीपुळ्याच्या दिशेला. गेली सतरा वर्षे प्रत्येक अंगारकी संकष्टीला सरुड ते गणपतीपुळे न चुकता पायी वारी ते करीत आहेत.१० मे २००५ रोजीच्या अंगारकी संकष्टीला सुभाष कुंभार यांनी प्रथम गणपतीपुळेला श्री गणेशाच्या दर्शनाला पायी चालत जाण्याचा निर्धार केला. दोन दिवसात कुंभार यांनी हे अंतर पार करत गणपतीपुळे गाठले. त्यानंतर पुढील १७ वर्षात आलेल्या ४४ अंगारकी संकष्टीला कुंभार हे न चुकता श्री गणेश दर्शनासाठी गणपतीपुळेला गेले आहेत. गेली दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे अशा पावसातुनही कुंभार हे आजच्या अंगारकी संकष्टीला गणपतीपुळेला पायी चालत गेले आहेत.दोन दिवसांचा चालत प्रवासरविवारी पहाटे साडेपाच वाजता सरुड येथून कुंभार यांचा पायी प्रवास सुरू होतो. ६५ कि. मी. चे अंतर पार करत रविवारी सांयकाळी ते करंजाळी ( जि . रत्नागिरी ) येथे मुक्कामाला थांबतात. दुसऱ्या दिवशी सोमवारी पुन्हा पहाटे साडेपाच वाजता करंजाळी येथून प्रवास करत दुपारी १२ च्या सुमारास नरंबे या गावात विश्रांती साठी थांबतात. दुपारी ३ च्या सुमारास आपला प्रवास सुरु ठेवत रात्री आठच्या वाजता ते गणपतीपुळे येथे पोहचतात. मंगळवारी सकाळी श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराशेजारील डोंगराला पाच चालत प्रदक्षिणा घालून ते भाविकांच्या गाडीतुन सरुडला परततात.
लहानपणा पासुनच मला गणेशभक्तीची आवड आहे. भाविक पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीतुन पायी चालत पंढरपूरला जातात. याच प्रेरणेतुन मी ही श्री गणेशाच्या दर्शनासाठी सरुड हून गणपतीपुळे येथील श्री गणेशाच्या दर्शनाला प्रत्येक अंगारकी संकष्टीला पायी चालत जाण्याचा संकल्प केला. या संकल्पनेतुनच गणपतीपुळेला चालत जाऊ लागलो. भविष्यातही येणाऱ्या प्रत्येक अंगारकी संकष्टीला पायी चालत जाण्याची माझी ही १७ वर्षाची परंपरा मी अखंडितपणे सुरु ठेवणार आहे - सुभाष कुंभार, गणेशभक्त