कोल्हापूर - कोल्हापूरच्या तालमी आणि त्या तालमीचे वेगवेगळे ध्वज याची एक वेगळी ओळख आहे. कोल्हापूरमध्ये जशा अनेक तालमी प्रसिद्ध आहेत तसेच त्यांचे फुटबॉल संघही प्रसिद्ध आहेत. या तालमी, त्यांचे फुटबॉल संघ यांच्यामधील इर्षा ही वेगवेगळ्या निमित्ताने पाहावयास मिळते. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये दिसून येत आहे.
विविध मंडळांनी आपले ध्वज तयार केले असून हे रंगीबेरंगी ध्वज फडकवण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र कोल्हापूरमधल्या मिरजकर तिकटीवर शुक्रवारी दुपारी पाहायला मिळाले. एका बाजूला पाटाकडील तालीम मंडळ, दुसऱ्या बाजूला दिलबहार तालीम मंडळ, तिसऱ्या बाजूला बालगोपाळ तालीम मंडळ आणि चौथ्या बाजूला नंगीवली तालीम मंडळ या चारी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची नेहमीची ठरलेली रंगसंगती, त्याच्यापासून ध्वज तयार केलेले आहेत आणि हे ध्वज फडकवण्याची स्पर्धा या ठिकाणी लागल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे एकीकडे ध्वनी यंत्रणेचा दणदणाट आणि जल्लोषी वातावरणामध्ये हे ध्वज फडकवणारे युवक असं वातावरण आज दुपारी कोल्हापूरमध्ये पाहावयास मिळत आहे. सध्या कोल्हापूरमध्ये कडकडीत ऊन असून त्यामुळे ही तरुण मंडळींमध्ये मोठा उत्साह आहे आणि त्यामुळेच संध्याकाळी पाच नंतर या मिरवणुकीला आणखी जोर येणार यात शंका नाही.