कोल्हापूर : गणेशोत्सव आणि वाढते चेन स्नॅचरचे प्रमाण यांमुळे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार बुधवारी सकाळी संपूर्ण कोल्हापूर शहरात चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अचानक नाकाबंदी करून वाहने तपासणी केली. सुमारे ३५० हून अधिक पोलीस कर्मचारी रस्त्यांवर तपासणीसाठी उतरले होते. या नाकाबंदीमुळे अनेक वाहनधारकांची तारांबळ उडाली.गेल्या पाच महिन्यांत पोलीस यंत्रणा कोरोना संकटावर मात करण्यासाठी बंदोबस्तात अडकली आहे, याचाच फायदा घेऊन गेल्या दोन महिन्यांत रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांचे दागिने भरधाव दुचाकीवरून चोरट्याकडून हिसकावून नेण्याचे प्रमाण वाढत आहे.
त्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. त्यातच गणेशोत्सव बंदोबस्तातही पोलीस यंत्रणा गुंतली आहे. त्यामुळे चेन स्नॅचरसह अनेक गुन्हेगारांच्या कारवाया वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर तसेच गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी या उद्देशाने बुधवारी अचानक संपूर्ण शहरात सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत चौका-चौकांत पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहनांची कसून तपासणी केली.जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, लक्ष्मीपुरीचे अनिल गुजर, शाहूपुरीचे श्रीकृष्ण कटकधोंड, राजारामपुरीचे विकास डुबल, शहर वाहतूक शाखेचे वसंत बाबर यांच्यासह अधिकारी, पोलीस कर्मचारी असे सुमारे ३५० हून अधिकजण रस्त्यांवर उतरले.
नाकाबंदीमध्ये शहरात प्रवेशणाऱ्या मार्गावर तसेच प्रमुख चौका-चौकांत, वर्दळीच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवून वाहनांची कसून तपासणी केली. वाहनांची कागदपत्रे, लायसेन्स, आदी तपासणी नाकाबंदीमध्ये केली. नंबरप्लेट नसलेल्या वाहनांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.