कोल्हापूर : ‘चौसष्ट कला व विद्यांचा अधिपती’ असणाऱ्या गणपती बाप्पांचा उत्सव रचनात्मक, विधायक दृष्टीने साजरा व्हावा. करवीरनगरीतील गणेशोत्सव मंडळांनी विधायक उपक्रम, समाजप्रबोधनातून राज्यात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी बुधवारी येथे केले.कोल्हापूर शहरातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. दिगंबर जैन बोर्डिंगच्या सभागृहात कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे प्रमुख उपस्थित होते. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, कोल्हापूर ही सांस्कृतिक, सामाजिक नेतृत्व देणारी नगरी आहे. प्रबोधनपर देखाव्याची परंपरा असणाऱ्या कोल्हापुरात डॉल्बी मुक्तीसाठी बैठक घ्यावी लागते याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. उत्सवादरम्यान पर्यावरण संवर्धन, ध्वनिप्रदूषणविषयक कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे म्हणाले, ध्वनिप्रदूषण थांबविण्यासाठी केंद्रीय कायदा आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. ध्वनिप्रदूषण तपासण्यासाठी राज्याला ८ हजार नॉईज लेव्हल मीटर मिळाली आहेत. कायद्याने आखून दिलेल्या लक्ष्मणरेषेच्या आत राहून उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. तरुण मंडळे, डॉल्बी व्यावसायिकांच्या विरोधात पोलिस प्रशासन नाही; पण कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर असल्याचे वास्तव गणेशोत्सव मंडळांनी लक्षात घ्यावे. ध्वनीची मर्यादा डॉल्बी व्यावसायिकांनी देखील पाळावी.या कार्यक्रमास माजी महापौर आर. के. पोवार, भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, अनिल चौगुले, निरंजन कदम, गजानन यादव, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख, शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले, शहर वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, आदी उपस्थित होते. शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी आभार मानले. दरम्यान, बालगोपाल तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, जुना बुधवार पेठ तालीम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्याची ग्वाही दिली. (प्रतिनिधी)माता-भगिनींना सुरक्षित वाटावेमाझ्या गावात विधायक गणेशोत्सव राबवून त्यातून मिळालेल्या देणगीद्वारे स्पर्धा परीक्षांची पुस्तके आम्ही आणली. त्याच्या जोरावर अभ्यास करून यूपीएससी परीक्षेत मी यशस्वी ठरलो. गणेशोत्सव मंडळे हे समाजप्रबोधनाचे माध्यम आहे. ते लक्षात घेऊन मंडळांनी महिला सक्षमीकरण, शिक्षण, आदींबाबतचे विधायक उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. ते म्हणाले, ध्वनी, पर्यावरण रक्षणाबाबतच्या कायद्याचे पालन प्रत्येकाने करावे. गणेशोत्सवातील मिरवणुकीत आपल्या माता-भगिनींना सुरक्षित वाटले पाहिजे हे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी, तरुणांनी लक्षात घ्यावे.
गणेशोत्सव मंडळांनी ‘मर्यादा’ पाळाव्यात
By admin | Published: August 25, 2016 12:21 AM