चंदगड
: कोरोनाचे सावट पुन्हा एकदा डोक्यावर असतानाही विघ्नहर्त्याच्या आगमनाने ते दूर होईल या भावनेतून तालुक्यातील सर्वच गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मंडप उभारणीच्या कामांना प्रारंभ केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
कोरोनामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मोठमोठ्या मंदिरांनाही कुलपे लागली आहेत. कोरोनामुळे नागरिकांवरही निर्बंध आले आहेत. यातून विघ्नहर्ताच मार्ग काढेल व पुन्हा एकदा विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत सुरू होईल या भावनेतून तालुक्यातील सर्वच मंडळे कामाला लागली आहेत. दरवर्षी साधारणपणे १५ ऑगस्टदरम्यान गणेशोत्सव मंडळांची मुहूर्तमेढ रोवली जाते. त्यानुसार गणेशोत्सव मंडळे कार्यरत झाली आहेत.
कोरोना कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्याची मागणी हिरमोड झालेल्या तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. तालुक्यात मजरे कार्वे, माणगाव, चंदगड, अडकूर, तुर्केवाडी, हलकर्णी, धुमडेवाडी, शिनोळी येथील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. ही मंडळे प्रबोधनपर हालता देखावा, रक्तदान शिबिरे, सव्याख्याने, स्वच्छता अभियान आदी समाजोपयोगी उपक्रम राबवितात. तालुक्यातील सर्वच मंडळे या प्रसिद्ध मंडळाचे अनुकरण करू लागली आहेत. अडकूचे अष्टविनायक मंडळ, माणगावचे माणकेश्वर, मजरे कार्वेच्या शिवनेरी गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे.किणी, चंदगड, हेरे, कानूर, कोवाड, माणगाव यासह अनेक गावांत घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती बनविण्याचे कामही जोरात सुरू आहे.
-----------------
सातवणे व करंजगावचा वेगळा गणेशोत्सव
सातवणे व करंजगावमध्ये वैयक्तिक हालते देखावे सादर केले जातात. त्यामुळे गणेशोत्सव काळात ते पाहण्यासाठी या गावांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत असते.
-----------------
नियमाला धरूनच गणेशोत्सव
आम्ही उत्सवप्रिय आहोत. मात्र, आपल्या सर्वांवर ओढवलेली परिस्थिती खूपच भयानक आहे. त्यामुळे कर्तव्य बजावताना आम्हाला काहीवेळा कठोर व्हावे लागते. तुमच्या सर्वांच्या रक्षणाची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळूनच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांनी केले आहे.
फोटो ओळी : यशवंतनगर (ता. चंदगड) येथील गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणी कामास प्रारंभ केला आहे.
क्रमांक : २४०७२०२१-गड-०१