सचिन यादवकोल्हापूर: गेल्या चार दिवसांपूर्वी सुरक्षितेतच्या कारणांवरून ३३ गँगस्टर राज्यातील अन्य कारागृहात काही काळापुरते स्थलांतरित केले असले तरी अनेक गुन्ह्याचे कनेक्शन कळंबा कारागृहातील गँगस्टर आणि त्यांचे चेले आहेत. तुरुंगाधिकारी, अधीक्षकांवर हल्ला करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. त्यामुळे कळंबा प्रशासनाच्या यंत्रणेचा धाक कैद्यांवर राहिला नसल्याचे समोर आले आहेत.कळंबा कारागृहात देशभरातील कैदी आहेत. त्यामध्ये बॉम्बस्फोट, गँगस्टर, मोका, खून असे गंभीर गुन्हे दाखल असलेले कैदी आहे. अनेक कुख्यात गुंड, विदेशी गुन्हेगार, मोक्कामधील आरोपी, राज्यभरात गाजलेल्या प्रकरणांतील नामचिन गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत. त्यामध्ये मोक्कामधील २०३ कैदी असून ७ परदेशी कैदी आहेत. एकूण २२१२ कैदी आहेत. राज्यभरातील गंभीर गुन्ह्यातील कैदी कारागृहात बंदिस्त असतात. एकेकाळी मुंबई, पुणे, तळोजा, नागपूर पाठोपाठ कोल्हापुरातील कळंबा कारागृहाच्या कारागृहाची सुरक्षा अव्वल दर्जाची मांडली जात होती. मात्र आता कळंबा कारागृहाची शिस्त बिघडली आहे.
कळंबा कारागृहात सातत्याने काही ना काही घडत असते. आता कारागृहात मोबाइलची टीप दिल्याच्या कारणावरून गुंडासह सुभेदाराला मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. जर्मनी टोळीच्या म्होरक्यासह १४ जणांनी केलेल्या मारहाणीत सुभेदार गंभीर जखमी झाला. जर्मनी टोळी, गजा मारणे टोळी, मुंबई, पुणे येथील मोक्कातील गंभीर गुन्हेगार कळंबा कारागृहात आहेत. कारागृहात राहून राज्यातील गुन्हेगारीचा कट येथूनच शिजत आहे. मोक्कातील गुन्हेगार हे बाहेर असलेल्या आपल्या टोळी प्रमुखांकडून खंडणी, खून करून घेत असल्याचे यापूर्वी झालेल्या पोलिस तपासात उघड झाले आहे. सध्या त्याचे स्थलांतर केले असले तरी त्यांचे चेले कारागृहात आहेत. त्यांच्याकडून गुन्हेगारी यंत्रणा सुरू आहे.
गुन्हेगारीच्या घटना३ मार्च २०२२कैद्यांत हाणामारी, वृद्ध कैदी जखमी२७ एप्रिल, २०२२कैद्यांचा कारागृह अधीक्षकांवर हल्ला३ जानेवारी, २०२३सातारा जिल्ह्यातील कैद्यांच्या दोन टोळ्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून धुमश्चक्री२६ एप्रिल २०२३सत्यपाल सिंग कोठाडा कैद्याचा खून५ ऑगस्ट २०२३मोक्का आरोपींनी खुनाचे षडयंत्र रचले१३ ऑगस्ट २०२३कळंबा मध्यवर्ती कारागृहात डोक्यात बादली मारली म्हणून कैद्यांत धुमचक्री१४ एप्रिल २०२४जर्मनी टोळीतील म्हाेरक्यासह १४ जणांचा सुभेदारावर हल्ला
पुणे कनेक्शन?कारागृहातील मोबाइल प्रकरणाचा तपास यंत्रणेकडून सुरू आहे. यात जिल्ह्यातील दोन टोळ्यांसह पुण्यातील एका टोळीचा तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. या टोळीशी काय कनेक्शन शोधण्याचे काम पथकाकडून सुरू असल्याचे समजते.
गँगस्टरचे स्थलांतरसुरक्षेच्या कारणामुळे कळंबा कारागृहातील ३३ गँगस्टार राज्यातील विदर्भातील कारागृहात तात्पुरते स्थलांतरित केले आहेत. त्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अमरावती, पुणे, सातारा, इचलकरंजी येथील गँगस्टरचा समावेश आहे.
कारागृहात शिजतात कटपहिल्यांदाच कारागृहात आलेले तरुण इथल्या अट्टल गुन्हेगारांच्या संपर्कात येतात. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर कारागृहात मिळालेले धडे गिरवतात. सांगलीतील खून प्रकरण, कोल्हापुरातील काही गुन्हे कळंबा कारागृहात शिजलेल्या कटातून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
या घडल्या घटना
- कैद्यांमध्ये हाणामारीत निशिकांत कांबळे कैद्याचा मृत्यू
- ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील गुंडानी मेणवली (ता. वाई) हॉटेल मालकाकडून १० लाखांची खंडणी
- कैद्यांची पार्टी व संशयित संतोष पोळने हातात पिस्तूल घेतल्याची क्लिप व्हायरल