कोल्हापूर : पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून दोन तरुणांचा पाठलाग करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघांना शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी (दि. १४) न्यायालयात हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. गुंड स्वप्निल संजय तहसीलदार (वय ३८), सागर संजय तहसीलदार (वय ३४, दोघे रा. महाडिक कॉलनी, कोल्हापूर) आणि अमित अनिल धोंदरे (रा. राजर्षी शाहू मार्केट यार्डजवळ, कोल्हापूर) अशी तिघांची नावे आहेत.गुंड स्वप्निल तहसीलदार आणि त्याच्या साथीदारांनी मंगळवारी रात्री साडेनऊ ते साडेदहाच्यादरम्यान मुक्त सैनिक वसाहत येथे दोन तरुणांना पाठलाग करून बेदम मारहाण केली होती. स्वप्निल याने एका तरुणाच्या डोक्याला पिस्तूल लावून त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी १५ ते २० गुंडांना तलवारी, एडके नाचवत मुक्त सैनिक वसाहत परिसरात दहशत माजवली होती.
याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गुंड स्वप्निल याच्यासह त्याचा भाऊ सागर आणि साथीदार अमित धोंदरे या तिघांना तातडीने अटक केली. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके अधिक तपास करीत आहेत.दहशत माजवणारे गुंड पळालेमुक्त सैनिक वसाहत परिसरात दहशत माजवण्यात १५ ते २० गुंडांचा सहभाग होता. गुन्हा दाखल होताच संशयितांनी पळ काढला. त्यांच्या अटकेसाठी शाहूपुरी पोलिसांसह उपअधीक्षक टिके यांचे पथक प्रयत्न करीत आहे. धमकावण्यासाठी गुन्ह्यात वापरलेले पिस्तूलही जप्त केले जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.