कोल्हापूर : येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात भिंतीलगत असलेल्या शेतीमध्ये सुरक्षा रक्षकांना एक पार्सल सापडले. यात शंभर ग्रॅम गांजा, दोन मोबाइल, दोन चार्जर, दोन डेटा केबल अशा वस्तू सापडल्याने खळबळ उडाली. मंगळवारी (दि. १८) सायंकाळी या वस्तू सापडल्या. कारागृहात या वस्तू कोणी आणि कोणासाठी टाकल्या आहेत, त्याचा शोध कारागृह प्रशासनाकडून सुरू आहे. याबाबत पोलिस शिपाई विजय बनकर यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.कळंबा कारागृहात मोबाइल, सीमकार्ड सापडण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. न्यायालयीन किंवा वैद्यकीय कामासाठी बाहेर गेलेले कैदी चोरट्या मार्गाने मोबाइल, सीमकार्ड अशा वस्तू कारागृहात घेऊन जातात. कारागृहाच्या भिंतीवरूनही काही वस्तू आत टाकण्याचे प्रकार सुरू असतात. मंगळवारी असाच एक प्रकार उघडकीस आला.सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षकांना शेती परिसरात एक प्लास्टिकचे पार्सल सापडले. कार्यालयात आणून त्याची तपासणी केली असता त्यात १०० ग्रॅम गांजा, लहान आकाराचे दोन मोबाइल, दोन चार्जर, दोन डेटा केबल असा अडीच ते तीन हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला.कारागृहात सापडलेल्या या वस्तू कोणी टाकल्या आणि त्या कोणत्या कैद्यापर्यंत पोहोचवल्या जाणार होत्या, याबाबतचा तपास पोलिस व कारागृह प्रशासनाकडून सुरू आहे.
कैद्यांची झडतीया घटनेची गांभीर्याने दखल घेऊन कारागृह प्रशासनाने जेलमधील सर्व कैद्यांची झडती घेतली. यात काहीच हाती लागले नसल्याचे कारागृह अधीक्षकांनी सांगितले.