कोल्हापूर : कळंबा कारागृहातील कैद्यांसाठी बॉलमधून गांजा, मोबाईल, सीमकार्ड आदी साहित्य संरक्षण भिंतीवरुन टाकण्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. पण काल, सोमवारी सकाळी चक्क स्पीड पोस्टाच्या पाकिटातून गाय छाप तंबाखूच्या पुडीत गांजा लपवून कैद्यांसाठी पाठवल्याचे उघड झाले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सायंकाळी श्रीकांत दिलीप भोसले (रा. फुलेवाडी ४ था स्टॉप, कोल्हापूर) या संशयितावर गुन्हा नोंदवला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कैद्यासाठी कारागृहात बॉल फेकून त्याद्वारे गांजा पुरविल्याच्या अनेकवेळा घटना उघडकीस आल्या. पण कारागृहातील कैदी असलेल्या मित्राला स्पीड पोस्टाच्या पाकीटातून चक्क गांजा पाठवल्याची घटना प्रथमच घडली.कळंबा कारागृहात कैद्यांना रजिस्टर ईडी व स्पीड पोस्टाद्वारे आलेली पत्रे तपासून दिली जातात. सोमवारी सकाळी शिक्षाधिन कैदी महेश सुरेश पाटील याच्याकडे हे तपासण्याचे काम दिले आहे. तो मेनगेटमधून सर्कलमधील कैद्यांना आलेली पत्रे तपासत होता. त्यावेळी कारागृहात सुरज दिलीप भोसले सर्कल नं. ५/२ मध्ये या नावाचा कैदी नसताना त्याच्या नावे श्रीकांत भोसले याने स्पीड पोस्टाने पाकीटातून तीन ग्रॅम गांजा सदृश्य पाला कारागृहात पाठवल्याचे दिसून आले. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याची तक्रार तुरुंगाधिकारी निशा श्रेयकर यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली. त्यानुसार भोसले याच्यावर गुन्हा नोंद झाला.
अजबच! कोल्हापुरातील कळंबा कारागृहात चक्क स्पीड पोस्टाने पाठवला गांजा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 11:51 AM