कोल्हापूर : कोरोना आणि महापुरामुळे यंदा नव्या रूपातील गणेशमूर्ती बनविल्या गेल्या नसल्या तरी वर्षापूर्वी आलेल्या कोल्हापुरी फेटा आणि धोतर परिधान केलेल्या गणपती बाप्पांचा थाट यंदाही कायम आहे. यामूर्तीला कोल्हापूरसह गडहिंग्लज, सांगली, मुंबई आणि गोव्यातूनही या मूर्तींना मोठी मागणी आहे. गणेशोत्सवाला आता २० दिवस राहिल्याने कुंभारवाड्यांमध्ये गणेशमूर्ती आता वेगवेगळ्या आकर्षक रंगांत रंगू लागल्या आहेत.
आबालवृद्धांच्या लाडक्या गणरायाचा उत्सव १० सप्टेंबरला सुरू होत आहे. सण जवळ आल्याने कुंभारवाड्यांमध्ये गणेशमूर्ती बनविण्याला वेग आला आहे. यंदा कोल्हापुरी फेटा आणि धोतर परिधान केलेल्या गणेशमूर्तींचे वेगळेपण आहे. यात फेटा आणि धोतर उंची साड्या कापून त्यापासून बनविल्या जातात. पेशवाई रूपातील, लालबागचा राजा, चिंतामणी, उंदीर, जास्वंदीच्या फुलात बसलेला गणपती, सिंहासनाधिष्ठित अशा वेगवेगळ्या रूपांतील गणेशमूर्तीं लक्ष वेधून घेत आहेत.
महापुरामुळे शेक़डो मूर्ती खराब झाल्या तरी ज्यांचे मोल्ड भिजले नाही त्यांनी नव्याने गणेशमूर्ती बनविल्या. ज्यांचे मोल्ड भिजले त्यांना मात्र आपले काम थांबवावे लागले. विशेषत: शाहूपुरी कुंभार गल्ली आणि बापट कॅम्पला मोठा फटका बसला. गंगावेश, लक्षतीर्थ वसाहत, साने गुरुजी वसाहत, मार्केट यार्ड येथेदेखील मोठ्या प्रमाणात मूर्ती बनविल्या जातात. ज्यांच्या मूर्ती खराब झाल्या त्यांनी अन्य कुंभारांकडून कच्च्या मूर्ती घेऊन रंगकामाला सुरुवात केली आहे.
---
नोंदणी सुरू
तयार गणेशमूर्तींची नोंदणी (बुकिंग) आता सुरू झाले आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने मंडळांकडूनही मूर्तीची ऑर्डर दिली जात आहे. मंडळांना जास्त उंचीच्या वेगवेगळ्या रुपातल्या गणेशमूर्ती हव्या असल्या तरी शासनाने चार फुटांपर्यंतचीच मर्यादा दिल्याने मोठ्या मूर्ती बनविलेल्या नाहीत.
---
परगाववारी थांबली..
कोल्हापुरातून दीड ते दोन लाख गणेशमूर्ती गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश अशा परराज्यांत पाठविल्या जातात. यंदा मात्र महापुरामुळे गणेशमूर्तींचे नुकसान झाल्याने बाप्पांची परगाववारी थांबली आहे. कुंभारांनी आता सगळ्या मूर्ती कोल्हापूरकरांसाठी ठेवल्या आहेत.
---
कोल्हापुरी फेट्यातील गणेशमूर्तींना यंदा खूप मागणी आहे. गडहिंग्लज, सांगली, मुंबई, गोव्यातूनही या मूर्तींना अधिक पसंती आहे. याशिवाय मंडळांसाठी पाटील गणपती, लालबागचा राजा अशा विविध रूपांतील गणेशमूर्ती आहेत.
- संकेत सुरेश माजगावकर
मूर्तिकार, बापट कॅम्प, कोल्हापूर
--
फोटो नं १८०८२०२१-कोल-गणपती०१
ओळ : कोल्हापुरातील बापट कॅम्प येथे बुधवारी कोल्हापुरी फेट्यातील गणेशमूर्तीचे काम करताना संकेत माजगावकर व कुटुंबीय.
---
०२
ओळ : कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्लीत बुधवारी मंडळांच्या गणेशमूर्तीचे रंगकाम करताना उदय कुंभार. (छाया : आदित्य वेल्हाळ)