कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवाआधीच घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. प्रशासनाने आणि कुंभार बांधवांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी गणेशचतुर्थीच्या आधीपासूनच गणेशमूर्ती नेण्यास सुरुवात केली आहे.गणेशचतुर्थीला आता दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे घरोघरी गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. दरवर्षी महिनाभर आधीपासूनच जय्यत तयारी असते. यंदा दारावर कोरोनाचे संकट उभे असल्याने नागरिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत आहेत.
सगळीकडे भीतीचे वातावरण असल्याने बाजारपेठेतही अपेक्षित प्रमाणात ग्राहक येत नाहीत. असे असले तरी गणपती बाप्पा पाहुणे म्हणून घरी येणार याचा आनंद आणि अपूर्वाई कमी झालेली नाही. यंदा डामडौल थोडा कमी असेल, सजावट गेल्यावर्षीचीच असेल; पण देवाच्या भक्तीत कुठेही कमतरता असणार नाही, हे दाखवून देत कोल्हापूरकरांनी उत्सवाची तयारी सुरू केली आहे.गणेशचतुर्थीदिवशीच कुंभार बांधवांकडून गणेशमूर्ती नेण्याची पद्धत आहे. मात्र एकाच दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने व कुंभार बांधवांनी चार दिवस आधीपासूनच नागरिकांनी गणेशमूर्ती न्यावी, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत बुधवारपासूनच गणेशमूर्ती नेण्यास सुरुवात झाली.
शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प, गंगावेश या कुंभारवाड्यांसह साने गुरुजी वसाहत, लक्षतीर्थ अशा विविध ठिकाणी लोक आपली ठरलेली मूर्ती नेण्यासाठी येत आहेत. मूर्ती नेण्यासाठी आलेल्या नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यास लावले जात आहे.घरपोच सेवाप्रशासनाने २० ते २१ तारखेपर्यंतच गणेशमूर्ती नेण्यास सांगितले आहे. मात्र ज्यांना आधी येऊन नेणे शक्य नाही अशा लोकांना मूर्ती घरपोच करण्याचीही सोय करण्यात आली आहे. कुंभार बांधवांकडून रिक्षा ठरवली जात आहे. ग्राहकाचा पत्ता देऊन मूर्ती घरपोच केली ती त्याचे भाडे ग्राहकाकडून भागवण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी कुंभारांनी घराबाहेरच टेबल मांडून मूर्ती देण्याची सोय केली आहे.