कोल्हापूर: यंदाच्या वर्षी घरगुती गणपतींचे शंभर टक्के पर्यावरणपूरक विसर्जन होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर कोरोनाचे संकट असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करावे लागत आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून युद्धपातळीवर नियोजन करण्यात येत आहे.
गुरुवारी (दि. २७) घरगुती गणपती विसर्जनावेळी १६० ठिकाणी पर्यावरण विसर्जन कुंडे ठेवली जाणार आहेत. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाप्रमाणेच पर्यावरणपूरक विसर्जन कुंडांमध्ये मूर्ती विसर्जित करा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.कोरोनाविषयी नागरिकांमध्ये असलेले गांभीर्य आणि महापालिकेने केलेले चांगले नियोजन यांमुळेच दीड दिवसाचे गणेशमूर्ती विसर्जन पर्यावरणपूरक करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा प्रथमच मोठ्या संख्येने म्हणजेच दीड दिवसाच्या ३८६ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन झाले.
गुरुवारी सहा दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन आहे. यासाठीही महापालिकेने चोख नियोजन केले आहे. विसर्जन कुंड येथे संकलित होणाऱ्या मूर्ती कोणताही धक्का न लागता टेम्पो आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने इराणी खण येथे विसर्जित केल्या जाणार आहेत.रंकाळा, पंचगंगा परिसरात १२ विसर्जन कुंडेमहापालिका प्रशासनाच्या वतीने रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जनाला बंदी घातली असली तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ८१ प्रभागांत १६० विसर्जन कुंडांसह रंकाळा आणि पंचगंगा येथे १२ पर्यावरणपूरक विसर्जन कुंडे ठेवण्यात आले आहेत. यामध्ये रंकाळा तलाव परिसरात सहा, पंचगंगा नदीघाट परिसरात सहा कुंड आहेत.रंकाळा, पंचगंगा परिसरातील कुंडरंकाळा चौपाटी परिसर, संध्यामठ, राजे संभाजी तरुण मंडळ, तांबट कमान परिसर, पदपथ उद्यान, पतोडी खण, पंचगंगा घाट परिसर, जामदार क्लबसमोर, तोरस्कर चौक.विसर्जन कुंडाभोवती गर्दी करू नकामहापालिका गुरुवारी सकाळी आठ वाजता प्रत्येक प्रभागात पर्यावरणपूरक विसर्जन कुंडाची सोय करणार आहे. त्यामुळे सायंकाळी चारनंतर एकाच वेळी घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी बाहेर पडू नये. गर्दी टाळण्यासाठी घरातील एकाच व्यक्तीने विसर्जनासाठी बाहेर पडावे, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.