कोल्हापूर : मंगलमूर्ती गणपती बाप्पा घरी आले की वातावरण भक्तीने भारलेले असते. देवाची रोजची पूजाअर्चा, नैवेद्य, पाहुणचार करताना आबालवृद्ध आनंदात असतात. यंदा मात्र घरगुती गणपती पाचव्या दिवशी विसर्जित होणार असल्याने भक्तांना हा आनंद केवळ पाचच दिवस घेता येणार आहे. बुधवारी घरोघरी हरितालिका पूजन होणार आहे.तो येणार-येणार म्हणत ज्याच्या आगमनाची आपण आतुरतेने जय्यत तयारी करीत आहोत, त्या लाडक्या गणरायाचे गुरुवारी मोठ्या जल्लोषात स्वागत होणार आहे. त्यासाठी घरोघरी स्वच्छता, आरास, खिरीच्या नैवेद्याची तयारी सुरू आहे. मंडळांकडूनही उत्सवाच्या नियोजनाची, तयारीची लगबग सुरू आहे.
गणपतीचे आगमन झाले की घरोघरी अलौकिक भक्तीची अनुभूती येते. आबालवृद्ध, कुटुंबातील हेवेदावे, वादविवाद, तंटा विसरून एकमेकांच्या साथीने देवाची भक्ती करतात. सुंदर आराशीने घराचे रूप खुलून येते. गोडाधोडाचे जेवण होते. सकाळ-संध्याकाळ आरती, नैवेद्य, प्रसाद वाटप यांत मोठ्यांसह लहानग्यांचा दांडगा उत्साह असतो. गेली दोन वर्षे घरगुती गणेशोत्सव सात दिवसांचा होता. सातव्या दिवशी गौरी-गणपतीचे विसर्जन झाले होते. यंदा मात्र त्यातील दोन दिवस कमी झाले असून, घरगुती गणेशोत्सव पाचच दिवसांसाठी रंगणार आहे.बुधवारी हरितालिका पूजन आहे. या दिवशी कुमारिका चांगला पती मिळण्यासाठी व सुवासिनी अखंड सौभाग्य व कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी शंकराची आराधना करतात. गुरुवारी (दि. १३) गणेशचतुर्थी असून त्या दिवशी घरगुती व मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन होणार आहे. शुक्रवारी (दि. १४) ऋषिपंचमी आहे; तर शनिवारी सोनियाच्या पावलांनी गौराईचे आगमन होणार आहे.
या दिवशी गौराईला वडी, भाजी, भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. रविवारी (दि. १६) शंकरोबाचे आगमन व गौराईचे पूजन होते. या दिवशी गौरी-गणपती, शंकरोबा या परिवार देवतांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. सायंकाळी घरोघरी हळदी-कुंकूचे आयोजन केले जाते. सोमवारी (दि. १७) ज्येष्ठा गौरी व घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.यंदा पाचव्याच दिवशी भक्तांना गणपती बाप्पांना निरोप द्यावा लागणार आहे. घरगुती गणपती गेले की नागरिकांची पावले मंडळांच्या देखाव्यांकडे वळतात; त्यामुळे यंदा मंडळांना देखाव्यांसाठी घाई करावी लागणार आहे.