कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव व मोहरम साध्या पद्धतीने साजरा करावा. विद्युत रोषणाई, देखावे, मिरवणुका टाळाव्यात, असे आवाहन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बैठकीत केले. त्यानुसार मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे यंदा गणेशोत्सव व मोहरममध्ये मिरवणुका निघणार नसल्याचे स्पष्ट झाले. बैठकीस महापौर निलोफर आजरेकर ह्या प्रमुख उपस्थित होत्या.पालकमंत्री पाटील यांनी पोलीस मुख्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व पोलीस ठाण्यांत जमलेले शांतता व मोहल्ला समिती सदस्य व गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी आवाहन केले. कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार मंडप गणेश मंडपाचा आकार १५ बाय १५ फूट करण्यास महापालिकेने मान्यता दिली.
कोरोनाचे संकट पाहता सर्वांनी गणेशोत्सवाला मोहरम यंदा साधेपणाने करावा, उत्सव कालावधीत सोशल डिस्टन्स मास्क व इतर नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन मंत्री पाटील यांनी यावेळी केले. प्रत्येक पोलीस ठाण्यात जमलेल्या कार्यकर्त्यांनी गणेशमूर्ती यापूर्वीच ठरविली असल्याने मंडपाला १५ बाय १५ फूट परवानगी द्यावी, अशी मागणी केली, यावेळी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी यास मान्यता दिली.
ट्रॅक्टर ट्रॉली प्रत्येक मंडळाजवळ अपेक्षित असून त्यावरच मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असेही आवाहन मंडळांना केले. अनेक कार्यकर्त्यांनी हे शक्य नसल्याचे सांगितले, पण त्यासाठी ज्या ठिकाणी ट्रॅक्टर-ट्रॉली शक्य नाही, त्या ठिकाणी मंडप उभारण्यास परवानगी देण्यात आली.गणेशोत्सव व मोहरम सण राज्य शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आभार मानले. बैठकीस, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.वॉर्डनुसार विसर्जन कुंडआयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी, शहरात प्रत्येक वॉर्डनुसार विसर्जन कुंड ठेवू. दान गणेशमूर्तीची महापालिका योग्य प्रकारे नियोजन करेल, जमा निर्माल्यापासून खत तयार करून जलप्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे सांगितले.