कोल्हापूर : गणपती बाप्पा मोरया..., गणेश गणेश मोरया...चा गजर, फटाक्यांची आतषबाजी, दारात सुरेख रांगोळी, सजलेली आरास, विद्युत रोषणाईचा झगमगाट अशा उत्साही वातावरणात घरोघरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले. कोरोनाची भीती मागे सारत; पण गर्दी टाळून कोल्हापूरकरांनी बाप्पांचे स्वागत केले. हे संकट लवकर दूर होऊ दे, तुझी सगळ्यांवर कृपा राहू दे, अशी प्रार्थना करण्यात आली.महाराष्ट्रातील आबालवृद्धांचा लाडका देव गणपतीचे शनिवारी गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर आगमन झाले. एरवी हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात आणि कोल्हापूरकरांच्या हौसेने साजरा होतो. यंदा कोरोनामुळे सगळ्यांनी उत्साहाला थोडीशी मुरड घातली असली तरी बाप्पांच्या स्वागतात कुठेही कमतरता ठेवली नाही. गेल्या दोन दिवसांपासून घराघरांत देवाच्या आराशीची मांडणी सुरू होती. कुटुंबातील कर्ती मंडळी आपली कल्पनाशक्ती पणाला लावून सजावट करीत होती. लहान मुलांची लुडबूड होती. गर्दी टाळण्यासाठी अनेकांनी दोन दिवस आधीच गणेशमूर्ती घरी नेल्या.शनिवारी सकाळपासूनच घराघरांत गणपतीच्या स्वागताची तयारी सुरू होती. घराची स्वच्छता झाली, दारात सुरेख रांगोळी सजली, स्वयंपाकघरातून खीर, मोदकांचा दरवळ आला, गणपती बाप्पांची मूर्ती दारात आली आणि त्यांची नजर काढून औक्षण करण्यात आले. दारात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सजलेल्या आराशीच्या मधोमध बाप्पांची स्वारी बसली आणि आरास खुलून दिसली. त्यानंतर आरती, मिठाईचा प्रसाद, नैवेद्य दाखवून कुटुंबीयांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. यापुढे सहा दिवस घरोघरी हा गणेशोत्सवाचा सोहळा रंगणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी विघ्नहर्त्याचे स्वागत अत्यंत साधेपणाने व परंतु आनंदाने केले. अनावश्यक गर्दी टाळली. उत्साहात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याची दक्षता तुम्ही-आम्ही मिळून घेऊ या. जगावरील कोरोनाचे विघ्न नष्ट होऊ दे, अशीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करीत आहे.सतेज पाटीलपालकमंत्री, कोल्हापूर
पावसाची उघडीपगेल्या सात-आठ दिवसांपासून रिपरिप सुरू असलेल्या पावसाने शनिवारी मात्र चांगली उघडीप दिली. अधूनमधून पावसाची सर येत होती. मात्र लख्ख ऊनही पडत होते. त्यामुळे नागरिकांचा बाप्पाच्या स्वागताचा जल्लोष आणखी द्विगुणीत झाला.