कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाने सुरू केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन उपक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदा सहाव्या वर्षी उच्चांकी दोन लाख ३७ हजार ४३५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींनी चोख नियोजन केले होते.पाणी आणि स्वच्छता विभागाच्या वतीने या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला ग्रामस्थांच्या मनांतही अनेक शंका होत्या. मात्र याबाबत जनजागरण, त्यांच्या मनातील शंका दूर करण्यापासून ते पर्यायी व्यवस्थेपर्यंत नियोजन करण्यासाठी हा विभाग सातत्याने कार्यरत राहिला. मूर्ती संकलन करून पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून या उपक्रमामुळे कोणाच्या भावना दुखावू नयेत, याचीही काळजी याही वर्षी घेण्यात आली.अनेक गावांमध्ये विसर्जनासाठी मंडप उभारण्यात आले होते. तेथेही सामाजिक अंतर राखण्यासाठी वर्तुळे आखण्यात आली होती. मोठमोठ्या काहिली, पातेली, बॅरेल्स यांच्या माध्यमातून या गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले.
निर्माल्य संकलनाचीही वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी घंटागाडी आणि ट्रॅक्टरची सोय करण्यात आली. गावागावांतील घराघरांमध्ये पाणी प्रदूषित न होण्यासाठीच्या या मोहिमेचा उद्देश पटल्याने हा प्रतिसाद सर्वत्र मिळाल्याचे दिसून आले.गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतींचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी या मोहिमेत संपूर्ण योगदान दिल्यानेच हे शक्य झाले. अनेक ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले तरीही जुन्या पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेसाठी आपले योगदान दिले.
करवीर तालुक्यातील देवाळे येथे १०० टक्के गणेशमूर्ती दान करण्यात आल्या. अनेक ग्रामपंचायतींनी घरोघरी जाऊन मूर्तिसंकलन केले. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, सदस्य, पंचायत समिती सदस्यांनी आपापल्या गावी मूर्तिदान केले.
- १०२५ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रांत विसर्जन
- घरगुती मूर्तिदान २,३१,५४४
- सार्वजनिक मूर्तिदान ५,८६१
- पर्यायी व्यवस्थेतून विसर्जन २,२१,३९५
- कुंभार बांधवांना दिलेल्या मूर्ती १६,०४०
- निर्माल्य संकलन ४,७९,३५० किलो
- घंटागाड्या १९४
- ट्रॉली ११२३
विभागप्रमुखांच्या भेटीजिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांना या उपक्रमाचे सनियंत्रण करण्यासाठी तालुके विभागून देण्यात आले होते. त्यानुसार या अधिकाऱ्यांसह, तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनीही अनेक गावांमध्ये जाऊन या उपक्रमाला पाठबळ देण्याची भूमिका घेतली. पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांच्यासह त्यांच्या विभागाने या उपक्रमाचे नियोजन केले.२७०८२०२० कोल झेडपी ०२आजरा तालुक्यातील भादवण येथे कृत्रिम विसर्जन कुंडाची सोय करण्यात आली होती.२७०८२०२० कोल झेडपी ०३हातकणंगले तालुक्यातील टोप येथे विसर्जनासाठी सुशोभित मंडप उभारणी करण्यात आली होती.२७०८२०२० कोल झेडपी ०४करवीर तालुक्यातील आरे येथे निर्माल्य दान करण्यासाठी ट्रॅक्टरची सोय करण्यात आली होती.