कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील तरुण मंडळांकडून शासन नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यातील बहुतांश मंडळांनी मूर्ती, देखावे आणि सजावटींचे व्हिडीओ, छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित केली आहेत.बाप्पांसह देखावे, सजावटीचे ऑनलाईन दर्शन घडत आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीला दोन दिवसांचा अवधी राहिला असताना रविवारी शहरात भाविक, नागरिकांची तुरळक गर्दी होती. कोरोनामुळे यंदा अधिकतर मंडळांनी सजावटीसह कोरोनाबाबतच्या जगजागृती, प्रबोधनावर भर दिला आहे. प्रिन्स क्लब (खासबाग), जय शिवराय मंडळ (साकोली कॉर्नर), राधाकृष्ण मंडळ (मंगळवार पेठ), दादाप्रेमी गंगावेश संयुक्त मित्रमंडळ, आदी मंडळांचा समावेश आहे.काही मंडळांनी गणेशोत्सव आणि मोहरम एकत्रितपणे साजरा केला आहे. रविवारीची सुटी आणि सायंकाळी पावसाने उघडीप दिल्याने काही नागरिक हे मूर्ती, सजावट पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, त्यांचे प्रमाण तुरळक होते.
अधिकतर जण हे दुचाकीवरून धावत्या स्वरूपात मूर्ती, सजावट पाहत होते. शिवाजी चौक तरुण मंडळाची २१ इंच मूर्ती आणि मार्केट यार्ड येथील २१ फुटी महागणपती, छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ, ताराबाई रोडवरील वखार ग्रुप, आदी मंडळांच्या मूर्तींचे नागरिक हे सोशल डिस्टन्सिंग राखून दर्शन घेत होते.