कोल्हापूर : हॉकी स्टेडियम ते नॉर्थ स्टार हॉस्पिटल परिसरात एक चारचाकी आणि दोन दुचाकींना धडक देणाऱ्या सीपीआरच्या भरधाव रुग्णवाहिकेला थांबवले असता त्यात गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या तरुणी आढळल्याचा प्रकार रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आला. हा प्रकार समजताच जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केवळ माहिती घेत रुग्णवाहिका मार्गस्थ केली. यावेळी जमलेल्या नागरिकांनाही घरी जाण्यास सांगितले.प्रत्यक्षदर्शी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल चौधरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास हॉकी स्टेडियमसमोरून गोखले महाविद्यालयाच्या दिशेने एक रुग्णवाहिका (एमएच ०९ एफएल ६७०९) सायरन वाजवत भरधाव निघाली होती. तिने एक चारचाकी आणी दोन दुचाकी वाहनांना ओव्हरटेक केले व पुढे जाऊन चारचाकी गाडीला धडक दिली. काही नागरिकांनी पाठलाग केला तेव्हा चालकाशेजारी दोन युवती बसल्याचे लक्षात आले. नॉर्थस्टार हॉस्पिटलसमोर त्यांनी ही रुग्णवाहिका थांबवली. नागरिकही तेथे जमा झाले. त्यांनी रुग्णवाहिकेचे मागचे दार उघडण्यास सांगतिले. सुरुवातीला चालकाने नकार दिला. मात्र, जमाव पाहून त्याने दरवाजा उघडला, तेव्हा आतमध्ये दाटीवाटीने गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या तरुणी बसल्याचे लक्षात आले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असून, त्या गरबा खेळण्यासाठी निघाल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी जाब विचारला आणि जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क केला.गस्ती पथकाने तत्काळ तेथे येत चालकाच्या परवान्याचे छायाचित्र काढून पुन्हा असा प्रकार न करण्याची ताकीद दिली आणि रुग्णवाहिका साेडून दिली व नागरिकांनाही पांगवले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. रात्री ११ वाजेपर्यंत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
सायरन वाजवत सुसाट, तीन वाहनांना धडक; रुग्णवाहिकेत होत्या गरबा खेळणाऱ्या तरुणी; कोल्हापुरातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 11:56 AM