कदमवाडी : गेल्या गुरुवारी लाईन बझार येथील कचरा डेपोला लागलेली आग अजूनही आटोक्यात आलेली नाही. गेल्या पाच दिवसात या आगीवर तब्बल २०० हून अधिक टँकरने पाणी मारले आहे. मात्र, धुमसणारी आग अजूनही विझली नसल्याने कचऱ्यातून प्रचंड धूर निघत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गेले काही दिवस धुमसणाऱ्या आगीने सोमवारी भीषण रूप धारण केले. यामुळे लाईन बझार, सर्किट हाऊस आदी परिसरात धुराचे लोट निर्माण झाले होते. सध्या वाढत्या तापमानामुळे कचऱ्याला वारंवार आग लागत आहे. गुरुवारी रात्री कचऱ्याला आग लागली होती. उन्हाच्या तीव्रतेने ती जास्तच धुमसली. साेमवारी या आगीमुळे धुराचे लोटच्या लोट निघू लागले. आगीचा धूर लाईन बझार ,सर्किट हाऊस, सरलष्कर पार्क, आकाशवाणी केंद्र आदी परिसरात पसरल्याने त्याचा स्थानिकांना त्रास होऊ लागला. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवीन येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून ढीग संपविण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत असले तरी, हे प्रयत्न अपुरे असल्याचे दिसून आले.
चौकट:
सांडपाणी प्रकल्पातील पाणी कधी वापरणार: या परिसरात कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी आग लागली, तर ती विझविण्यात अडचणी येतात. या ठिकाणी पूर्वी पाण्याचा टँकर ठेवला जात होता आणि त्याद्वारे आग विझविली जात होती. मात्र, यावेळेस टँकर ठेवण्यात आलेला नाही. सध्या कडक ऊन पडत असल्याने कचऱ्याला लागलेली आग विझविल्यानंतर ती पुन्हा धुमसत आहे. आग विझविण्यासाठी वापरण्यास योग्य असणाऱ्या पाण्याचा उपयोग केला जात आहे. मात्र, त्याऐवजी या प्रकल्पाशेजारी असणाऱ्या सांडपाणी प्रकल्पातील पाणी पाईपलाईन टाकून घेतले, तर चांगल्या पाण्याचा अपव्यय होणार नाही.
कोट
: कचऱ्याला लागलेली आग शुक्रवारपासून विझविण्याचे प्रयत्न सुरू असून आजअखेर २०० हून अधिक पाण्याच्या टँकरमधून पाणी मारले आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने आग धुमसत आहे. त्यामुळे ती आटोक्यात येण्यात अडचणी येत आहेत.
- निखिल पाडळकर,
विभागीय आरोग्य निरीक्षक
फोटो : ०५ ओळ.
पालिकेच्या कचरा डेपोस लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट पसरले होते .
(छाया - दीपक जाधव)