कोल्हापूर : महानगरपालिका उद्यान विभागातील कथित ट्री गार्ड घोटाळ्याप्रकरणी संबंधितांना नोटिसा लागू करण्यात आल्या असून, त्यांची चौकशी सुरू झाली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती शुक्रवारी स्थायी समिती सभेत देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मुरलीधर जाधव होते. दोन दिवसांपूर्वी भाजप व ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी उद्यान विभागातील ट्री गार्ड घोटाळा उघडकीस आणला असून, त्याचे पडसाद स्थायी समितीत उमटले. त्यावेळी ही माहिती प्रशासनाने दिली. ट्री गार्डचा घोटाळा झाला आहे त्याची प्रशासनाने कशी दखल घेतली, अशी विचारणा सत्यजित कदम, रूपाराणी निकम यांनी केली. नगरसेविकेच्या लेटरहेडचा दुरुपयोग करून त्यांची बदनामी करणे चुकीचे आहे. प्रत्येक नगरसेवकांनी किती ट्री गार्ड दिले याची माहिती नगरसेवकांना देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यापुढे ट्री गार्डसाठी रोख पैसे भरून न घेता धनादेशाद्वारे घ्यावेत, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. शहरातील कचरा उठावासाठी लागणाऱ्या घंटागाड्या, कंटेनर, आरसी वाहनांवर सदस्यांनी चर्चा उपस्थित करून ही यंत्रणा कधी उपलब्ध होणार, अशी विचारणा केली. त्यावेळी कंटेनर खरेदीची निविदा मंजुरीकरिता पुढील सभेत आणली जाईल, असे प्रशासनाने सांगितले. गणेशोत्सव जवळ आला असताना शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली नसल्याची तक्रार सभेत करण्यात आली. शहरात पावसामुळे रस्ते खराब झाले आहेत. विद्युत विभागाकडे मटेरियल उपलब्ध नसल्याने भागातील कामे केलेली नाहीत, अशी तक्रार दीपा मगदूम यांनी केली (प्रतिनिधी)
‘उद्यान’ घोटाळ्याची चौकशी सुरू ‘स्थायी’त माहिती
By admin | Published: August 26, 2016 11:47 PM