कोल्हापूर : इलेक्ट्रॉनिक्स गॅस अलर्ट सिस्टीम, अॅटोमेटिक करंट कंट्रोलर, भांडी धुण्याचे मशीन, इको फे्रंडली हेअरडाय, वॉटरप्रूफ कापड अशा नावीन्यपूर्ण संशोधनाचे पैलू आज, शुक्रवारी शिवाजी विद्यापीठात उलघडले. निमित्त होतं विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन ‘आविष्कार’ हा मध्यवर्ती संशोधन महोत्सव. त्यातून राज्यस्तरीय महोत्सवासाठी ४८ जणांची निवड करण्यात आली.विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात हा महोत्सव झाला. त्यात पदवी, पदव्युत्तर अधिविभाग, एम.फिल., पीएच.डी., शिक्षक सहभागी झाले होते. त्यामध्ये चिखलीच्या डीएबीएन कॉलेजच्या तुषार शिंदेने बेनझीन व थर्माकोल एकत्रित करून केलेल्या केमिकलद्वारे वॉटरप्रूफिंगचा प्रकल्प सादर केला. विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील नामदेव हराळेने गॅस अलर्ट सिस्टीमचे सादरीकरण केले. अॅटोमेटिक करंट कंट्रोलरचा प्रकल्प सहभागी करण्यात आला होता. साताऱ्याच्या वाय. सी. इन्स्टिट्यूटच्या रुपाली गायकवाड, तेजस्विनी क्षीरसागर यांनी साताऱ्याच्या अर्थव्यवस्थेतील मत्स्य व्यवसायाचे स्थान, रणवीर पाटीलने कमी खर्चातील भांडी धुण्याचे मशीन महोत्सवात सादर केले. शिराळ्याच्या बाबा नाईक सायन्स् कॉलेजच्या राजेंद्र पाटीलने इको फे्रंडली हेअरडायचे संशोधन मांडले. त्यात त्याने मातीतील ‘स्प्रेक्टो मायसेस’ घटकाद्वारे हेअरडाय तयार केल्याचे सांगितले. धनश्री पाटीलने हसत-खेळत शिक्षणासाठीचे शैक्षणिक साधन, तर २१ व्या शतकात माण तालुक्यातील स्त्रियांची घटती संख्या हे वास्तव रेखा सूर्यवंशी हिने शोधनिबंधातून मांडले. नीलेश कांबळेने ‘कोल्हापूर शहरातील फेरीवाले : समस्या आणि उपाय’ हा शोधनिबंध सादर केला. मानव्यशास्त्र, भाषा, ललित, कला, शिक्षणशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन, कायदा, शुद्ध विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी, वैद्यक व औषध निर्माण शास्त्र विभागांमध्ये महोत्सव झाला. महोत्सवातील संशोधन पाहण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गर्दी केली होती. महोत्सवातून पदवी, पदव्युत्तर अधिविभाग, एम.फिल., पीएच.डी., शिक्षक विभागातून प्रकल्पांचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या प्रत्येक बारा जणांची राज्यस्तरीय महोत्सवासाठी निवड करण्यात आली.नागपूर येथील मत्स्यविज्ञान विद्यापीठात २० ते २३ जानेवारीदरम्यान राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सव होणार आहेत. त्यात ४८ जण शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार असल्याची माहिती प्रा. एस. आर. पाटील यांनी दिली. ते म्हणाले, निवड झालेल्या स्पर्धकांची पूर्वतयारी करून घेऊन त्यांना राज्यस्तरीय महोत्सवासाठी पाठविण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)समाजोपयोगी संशोधनाची दृष्टी जोपासा...या महोत्सवाचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आपल्या देशातील मुबलक सागर व खजिन संपत्ती उपलब्धतेवर आधारित संकल्पनेसंबंधीचे समाजोपयोगी संशोधन आवश्यक आहे. त्यादृष्टीने युवा संशोधकांनी कार्यरत राहावे, असे आवाहन केले. कार्यक्रमास शिक्षण शास्त्रच्या प्रा. डॉ. एम. व्ही. गुळवणी, डॉ. एस. एस. कोळेकर, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. एम. अनुसे, प्रा. एस. आर. पाटील आदी उपस्थित होते.
गॅस अलर्ट, इको फ्रेंडली हेअरडाय...
By admin | Published: January 03, 2015 12:24 AM