कोल्हापूर : गॅस सिलिंडरचे दर या महिन्यात सरासरी ९० रुपयांनी कमी झाले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, जिल्ह्यातील गॅस ग्राहकांना साधारण ६०० ते ६२१ रुपये दराने सिलिंडर विक्री होत आहे. गेल्या चार महिन्यांत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या रकमेने सिलिंडरचे दर कमी झाल्याचे चित्र आहे. या महिन्यात ग्राहकांच्या खात्यावर सरासरी १३६ रुपये सबसिडी जमा होईल.गॅस सिलिंडरचे दर हे जागतिक बाजारभावानुसार दर महिन्याच्या एक तारखेला बदलतात. त्यानुसार या महिन्यात दर कमी झाले आहेत. गत काही महिन्यांत दर वाढल्याने ग्राहकांचे घरखर्चाचे गणित कोलमडले होते. या महिन्यात सिलिंडर सरासरी ९० रुपयांनी स्वस्त झाल्याने ग्राहकांचा ताण थोडा हलका होणार आहे.तेल उत्पादक अरब राष्ट्रांचे एक मंडळ (बोर्ड) आहे. हे मंडळच जागतिक बाजारपेठेतील तेल व त्यावर आधारित उत्पादनांचे दर ठरविते. गेल्या काही दिवसांपासून क्रुड आॅईलचे दर जागतिक बाजारपेठेत कमी झाल्याने त्याचा परिणाम गॅसवरही झाला आहे. त्यामुळे सिलिंडरचे भाव गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात चांगलेच कमी झाले आहेत.जानेवारीत गॅस सिलिंडरचे दर साधारण ६८८ ते ७१० रुपये होते. त्यावेळी ग्राहकांच्या खात्यावर २१९.७४ रुपये इतकी सबसिडी जमा झाली होती. या महिन्यात हे दर साधारण ६०० ते ६२१ रुपये इतके झाले असून, या महिन्यात १३६ रुपये इतकी सबसिडी ग्राहकांच्या खात्यावर जमा होणार आहे. या महिन्यात गत महिन्याच्या तुलनेत ८८ ते ९० रुपयांपर्यंत दर कमी झाला आहे. त्यामुळे सरासरी ९० रुपये स्वस्त दराने सिलिंडर ग्राहकांना मिळणार आहे. या महिन्यातील दर हे आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार कमी झाले आहेत. तरी ग्राहकांनी घरपोच डिलिव्हरी मिळाल्यावर संबंधित डिलिव्हरी बॉयकडून रीतसर पावतीची मागणी करावी. त्यांच्याकडून टाळाटाळ अथवा जादा दराची मागणी केल्यास संबंधित गॅस वितरक किंवा जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा.- विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारीआंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरचे दर बदलतात. त्यानुसार या महिन्यात सिलिंडरचे दर कमी झाले असून, या दरानेच ग्राहकांना सिलिंडरचे वितरण केले जात आहे.- शेखर घोटणे, अध्यक्ष, गॅस जिल्हा वितरक संघटना
गॅस सिलिंडर ९० रुपयांनी स्वस्त
By admin | Published: February 20, 2016 12:36 AM