निपाणी : निपाणी नजीकच्या स्तवनिधी (तवंदी) घाटात कोचीनहून मुंबईकडे गॅस घेऊन जाणारा टँकर उलटला. टँकर उलटताच टँकरमधील गॅसची गळती सुरू झाली. त्यामुळे पुणे-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.या अपघातात टँकरचा चालक रणजितसिंग (वय ४०, रा. पंजाब) व क्लिनर जितेंद्र फार्मा (२३, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कोचीनहून मुंबईकडे प्रोपेन गॅस घेऊन जाणारा टँकर (एम एच ०४ एफ यू ५३९६) स्तवनिधी घाटामध्येआला असता हॉटेल व्हाईट हाऊसनजीकच्या वळणावरती वाहनचालकाचा ताबा सुटल्याने उलटला. अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊ लागली. घटनास्थळी निपाणी पोलिसांनी तातडीने धाव घेतली, तसेच अग्निशामक दलालाही या ठिकाणी पाचारण केले. मात्र, गळतीची तीव्रता जास्त असल्याने अग्निशामक दलाला गॅस गळतीवर नियंत्रण ठेवणे मुश्कील झाले. गॅसची गळती वाढल्याने निपाणी पोलिसांनी तातडीने वाहतूक थांबविली.
बंगलोरहून मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून बंगलोरकडे जाणारी वाहतूक घाटापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरापर्यंत ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा उशिरापर्यंत लागलेल्या आहेत. घटनास्थळापासून बेळगावच्या दिशेने कणंगलापर्यंत, तर कोल्हापूरच्या दिशेने निपाणीपर्यंत वाहनांच्या रांगा पाच किलोमीटरपर्यंत लागलेल्या होत्या.
अचानक घडलेल्या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. घटनास्थळी चिक्कोडीचे उपाधीक्षक दयानंद पवार, सहायक फौजदार एम. जी. निलाखे व आर. जी. शेख यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले. प्रोपेन गॅसची वाहतूक करणारा हा टँकर मोठा आहे. अन्य मार्गाने वाहतूक वळविली
राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे ज्यांना तातडीने जावयाचे आहे अशा वाहनधारकांना मुंबईकडे जाण्यासाठी गडहिंग्लजहून माद्याळ घाटातून सेनापती कापशीहून म्हाकवेमार्गे पुढे पाठविण्यात आले, तर कोल्हापूरहून बंगलोरकडे जाणारी वाहतूक निपाणीतून चिकोडी, संकेश्वरमार्गे बेळगावकडे वळविण्यात आल्याने वाहनधारकांना त्याचा फटका बसला.