आंबा: कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वालूर येथे गॅस टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली. वळणावर झाडाला धडक बसून टँकरने पेट घेतला. या दुर्घटनेत चालक गंभीर जखमी झाला. गॅस टँकरने पेट घेतल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुन आग विझवली.दरम्यान, आगीत केबीनमध्ये अडकलेल्या चालकास स्थानिक तरूणांनी धाडसाने वाचवले. तसेच १०८ रुग्णवाहिकेने मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आज, शुक्रवारी (दि.१३) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. शाहूवाडी पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, जयगडहून गॅस भरून हा टँकर आला होता. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वालूर येथे चालकाचे नियंत्रण सुडल्याने टँकर एका वळणावरील झाडाला धडकला. यात टँकरच्या केबीनला आग लागली. गॅस टँकरच्या केबीनला आग लागताच गॅसचा स्फोट होईल यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.चालकास पोत्यात घालून सुरक्षितस्थळी हलविलेसुहास आडविलकर, मारूती बोटांगळे, ज्ञानदेव पाटील, संकेत पवार, गुलाब तावरे या तरुणांनी जखमी चालकास पोत्यात घालून सुरक्षितस्थळी हलविले.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वालूर येथे गॅस टँकरला भीषण आग, चालक गंभीर जखमी; मोठी दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 2:42 PM