मुरगूड : हळदवडे (ता. कागल) येथे गेल्या दोन दिवसांपासून गॅस्ट्रोसदृश साथीने थैमान घातले असून, दीडशेहून अधिक रुग्णांना या रोगाची लागण झाली आहे. रुग्णसंख्या झपाटून वाढत असल्याने आरोग्य पथकाने गावातच ठाण मांडून रुग्णांवर जागा मिळेल तेथे उपचार करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गावाला दूषित पिण्याचा पाण्याचा पुरवठा झाला असल्याने साथ पसरली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मुरगूड शहरापासून चार किलोमीटर अंतरावर दोन हजार लोकसंख्या असणारे हळदवडे गाव तसे डोंगर कपारीतच वसलेले. या गावाला पिण्यासाठी कापशी रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याच्या काठावरील विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. या विहिरीतील पाणी मोटारपंपाच्या साहाय्याने गावच्या पश्चिमेला असणाऱ्या टाकीमध्ये नेले जाते व तेथून संपूर्ण गावाला सायफन पद्धतीने पुरविले जाते. या टाकी आणि विहीर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. दोन दिवसांपासून गावामध्ये जुलाब, उलटीचे रुग्ण आढळून आले. रुग्णांना प्रचंड अशक्तपणा जाणवल्याने काही रुग्णांना मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, तर सकाळी गावचे ग्रामदैवत ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात शेकडो रुग्ण जमा झाले. त्याच ठिकाणी चिखली आरोग्य पथकाने उपचार करण्यास सुरुवात केली. मंदिरासमोर असणाऱ्या सभामंडपामध्ये, जुन्या शाळेच्या खोलीत व ग्रामपंचायत कार्यालयातही रुग्णांना सलाईनद्वारे औषधोपचार सुरू केला. दुपारी बारापर्यंत अंदाजे दीडशे रुग्णांवर उपचार केले होते. जर साथ आटोक्यात आली नाही, तर रुग्णांचे लघवी व विष्ठेचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात येणार असून, त्या अहवालानुसारच वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. परिस्थिती नियंत्रणात असून, पंधरा कर्मचारी वैद्यकीय सेवा देण्यासाठी तत्परतेने कार्य करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन डॉ. आर. एम. मुल्ला यांनी केले आहे.
हळदवडेत १५० जणांना गॅस्ट्रो
By admin | Published: November 01, 2014 12:37 AM