गारगोटी : लोटेवाडी (ता. भुदरगड) येथे पिण्याच्या दूषित पाण्यामुळे सुमारे ६0 लोकांना अतिसाराची लागण झाली असून, त्यांच्यावर सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंकारी यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. लोटेवाडी हे तालुक्यातील दुर्गम भागातील एक गाव. मिणचे खोरीतील या गावाचा दूषित पाणीप्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गावातील ग्रामस्थांनी आपले नळकनेक्शन गटारीला लागून ठेवले असल्याने या नळाच्या ठिकाणी घरातील सांडपाणी, जनावरांच्या गोट्यातील घाण पाणी आणि शौचालयाचे दूषित पाणी गटारीद्वारे वाहत राहते. त्यामुळे पिण्याचे पाणीही दूषित बनत आहे. गावात सातत्याने दररोज २५ ते ४0 ग्रामस्थ, महिला, लहान मुले, वयोवृद्ध लोकांना जुलाब, उलट्या, ताप, खोकला, थंडी, मलेरिया, यांसारखे रुग्ण आढळून येत असून, प्राथमिक आरोग्य केंद्र मिणचे खुर्द या ठिकाणी ग्रामस्थ प्रथमोपचार घेण्यासाठी जात आहेत. दिवसेंदिवस लोटेवाडीचा पाणीप्रश्न चिघळत असल्यामुळे गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी, गावकरी हतबल झाले आहेत. या प्रश्नाची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन येथील पाणी प्रश्न, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. काळम्मावाडी धरणाच्या सर्व्हेतील हे गाव. काळम्मावाडी उजव्या कालव्यातून मिणचे खुर्दपर्यंत पाणी येऊन फक्तदीड कि.मी.अंतर असलेल्या आणि तहानलेल्या लोटेवाडीला शासनाने पाण्याअभावी वंचित ठेवले आहे. लोटेवाडीत गेल्या २५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याअगोदर माजी सरपंच कै. सिद्धू आबा सारंग यांच्या कारकिर्दीत बसुदेव देवालयापासून झऱ्याच्या उगमापासून पाझरणाऱ्या पाण्यापासून गावाला सायफनद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तो आजही कायम आहे. त्यानंतर युती शासनाच्या कालावधीत माजी आमदार नामदेवराव भोईटे यांच्या फंडातून गावासाठी पाण्याची योजना राबविली; पण जॅकवेलला पाणीच नसल्याने ही योजना बारगळली आहे. त्याबरोबर जलस्वराज्य प्रकल्पाद्वारे गावाला २३ लाखांची पिण्याच्या पाण्याची योजना राबविली. तीही योजना पाण्याअभावी कोसळली आहे. मागील तीन वर्षांत मोरेवाडीजवळ मोरव्हळ या ओढ्यावर जॅकवेलद्वारे पाणी योजना मंजूर झाली. २८ लाखांचा निधी या योजनेला मंजूर झाला. त्यात जॅकवेल बांधलेल्या ओढ्याच्या काठावर आणि तेथे पाणी पोहोचत नसल्याने ही योजना कुचकामी ठरली. बसुदेव देवालयाजवळील झऱ्याच्या उगमापासून सायफन पद्धतीने गावाला पाणीपुरवठा होत आहे; पण या ठिकाणी पाण्याची तळी आहे, त्या ठिकाणी जनावरे या पाण्यात बसतात. त्यांचे मलमूत्र आणि पालापाचोळा त्यामध्ये कुजतो आहे. दूषित पाण्यामुळे गावात रोगराई निर्माण होऊन ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, आप्पाचीवाडी लघु प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी, काळम्मावाडी उजव्या कालव्याचे पाणी मिणचे खुर्दपर्यंत आले आहे. तेच पाणी लोटेवाडीला मिळावे. फेब्रुवारीनंतर जूनपर्यंत पाण्याची कमतरता भासते. दरम्यान, मिणचे खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. पी. रिंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी यांनी बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, परिस्थिती आटोक्यात असल्याचे सांगितले. मुलगी कशी देणार?: लोटेवाडी नको रे बाबा लोटेवाडी (ता. भुदरगड) येथे मुलगी देऊन जावई करायचे म्हटले की, तुमच्या गावात पाण्याची सोय नाही मुलगी कशी देणार? हाच प्रश्न लोक विचारतात. त्यामुळे पिण्याचे पाणी असेल, तर मुलगी देतो, असे लोक म्हणत असतात. लोटेवाडीच्या व्याकुळ महिला पिण्याच्या पाण्यासाठी आजही संघर्ष करीत आहेत. डोक्यावर घागर घेऊन मिणचे खुर्दपर्यंत पायपीट करीत पिण्याचे पाणी आणत असतात. पाणीच नाही. दिवसाकाठी चारपाच घागरी पाणी मिळते. कूपनलिका एकच त्याला पाणी कमी. ६२ लाख पाण्यात, पाण्याच्या योजना कोम्यात पंडितरावांची कृपा बसुदेव धनगर वाड्यावरील पाणीच भागवितेय तहान गावात वारंवार दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात.
लोटेवाडीत ६0 लोकांना गॅस्ट्रो
By admin | Published: November 04, 2016 12:25 AM