अधिक माहिती अशी, यमगे येथील प्रभाग १, २ व ४ मधील पाच मतदान केंद्रे विद्यानगर येथील प्राथमिक शाळेत आहेत. सुमारे तीन हजार मतदार या केंद्रावर आहेत. या शाळेचे मुख्य गेट सुमारे केंद्रापासून दोनशे मीटर दूर आहे. शासन मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे यासाठी नवनवीन उपक्रम हाती घेत आहे. पण, यमगे केंद्रावर मात्र उलटच प्रकार पाहावयास मिळाला.
या ठिकाणी कर्तव्यास असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मुख्य गेटमधून अपंग आणि आजारी मतदारांसोबत नातेवाईकास येण्यास मज्जाव केला. शिवाय या गेटच्या आत अशा मतदारांना गाडी घेऊन जाण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे ज्यांना जागेवर उठता येत नाही अशा मतदारांना चालत जाऊन मतदान करणे शक्य नव्हते. शेवटी काही मतदारांनी मतदान न करताच घर गाठले. याबाबत पोलीस कर्मचाऱ्याला विचारणा करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना त्यांनी अरेरावी केली. शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सदरचे गेट उघडून अपंग आणि आजारी मतदारांना केंद्रापर्यंत येण्याची परवानगी दिली.
फोटो ओळ : यमगे (ता. कागल) येथील मतदान केंद्रे असणाऱ्या शाळेचे पोलिसांनी बंद केलेले मुख्य गेट दुपारनंतर उघडताना शासकीय कर्मचारी.