कोल्हापूर, 4 : एन.डी.डी.बी.आनंद, गुजरात यांच्यातर्फे दिला जाणारा देशपातळीवरील डेअरी उत्कृष्टता पुरस्कार (एक्सलन्स अॅवार्ड) गोकुळ्ला केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांच्या हस्ते व गुजरातचे मुख्यमंत्री विजयभाई रूपानी यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
रोख रक्कम रुपये तीन लाख, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून सदरचा पुरस्कार गोकुळच्या वतीने चेअरमन विश्वास पाटील यांनी स्वीकारला. यावेळी गोकुळचे कायर्कारी संचालक डी.व्ही.घाणेकर उपस्थित होते. गोकुळने महिला सबलीकरण या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार देऊन गोकुळ्ला सन्मानित करण्यात आलेले आहे.
गोकुळने महिला सबलीकरण करताना केलेल्या कार्याची नोंद एन.डी.डी.बी.ने घेतलेली आहे. गोकुळने आपल्या कार्यक्षेत्रात २३०० महिला बचत गट स्थापन करून २५ हजार महिलांनी या बचत गटांचे सभासदत्व स्वीकारलेले आहे. साडेपाच कोटी रुपयाच्या ठेवी असणारे हे महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सबल आहेत. गोकुळच्या सलग्न प्राथमिक दूध संस्थांच्या महिला सभासदांची संख्या अंदाजे दोन लाख असून दुग्धव्यवसायात महिलांचा सहभाग जास्तीत जास्त असून या व्यवसायातील ८० टक्के कामे महिलाच करतात.
गोकुळने प्रशिक्षण व प्रबोधनाच्या माध्यमातून महिलांना आरोग्य व आहाराबद्दल संपूर्ण ज्ञान प्राप्त करून दिलेले आहे. दुग्धव्यवसायातील संधीबाबत माहिती देणे, महिला बचतगट तयार करणे याचबरोबर महिलांच्या अभ्यास सहलींचे आयोजन करून दुग्धव्यवसायाबद्दल जागृती निर्माण करणे, तसेच महिलामधील नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी गोकुळने स्वतंत्र महिला नेतृत्व विकास विभाग स्थापन केलेला आहे.
या विभागाकडे गावा-गावातील शिक्षित महिलांची स्वयंसेविका म्हणून नेमणूक केलेली आहे. त्यांचेमार्फत प्रगत दुग्धव्यवसायाची माहिती महिलांपर्यंत पोहचविणे याचबरोबर दुग्धव्यवसायाबद्दल शास्त्रीय व तंत्रशुद्ध ज्ञान महिलांना देणे, याकरिता महिला मेळावे आयोजित करणे अशी प्रभावी कामे गोकुळ आपल्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र यंत्रणेद्वारे स्वखर्चातून करीत आहे. आजपर्यंत पाच हजार पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे महिला प्रशिक्षणाचे वर्ग गोकुळने आपल्या कार्यक्षेत्रात आयोजित केलेले आहेत.
गोकुळने दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा हे ध्येय गोकुळने ठेऊन महिला नेतृत्व विकास करताना महिला सबलीकरणाचे काम चांगल्या प्रकारे केलेले आहे. झिम्मा-फुगडी सारख्या सांस्कृतिक खेळाच्या स्पर्धेचे आयोजन करताना या महिला खेळामधून गोकुळच्या योजना तसेच दुग्धव्यवसायाबद्दल माहिती देणारी गाणी, उखाणे यांचे सादरीकरण प्रत्येक वर्षी गोकुळमार्फत करण्यात येते.
झाड्पाल्यापासून आयुर्वेदिक औषध निमिर्ती करणे हा घरगुती व्यवसाय करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देऊन गोकुळ त्याकरिता सहकार्य करत आहे. दर दहा दिवसाचे दुधाचे बिल महिला दूध उत्पादकांच्या हातात देण्याची योजना गोकुळने सर्वप्रथम प्रभावीपणे राबविली आहे.
गोकुळकडे सध्या ८३८ महिला दूध संस्था दूध पुरवठा करत आहेत. गोकुळने केलेल्या आपल्या कार्यक्षेत्रातील या कामाची नोंद घेऊन एन.डी.डी.बी.ने गोकुळ्ला महिला सबलीकरणाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल एक्सलन्स अॅवार्ड देऊन सन्मानित केले आहे.