भिकाजी पाटील
बाजार भोगाव : जंगलातील वणव्यामुळे जंगल बेचिराख झाली असून जंगली प्राण्यांची पावले आता शेतकऱ्यांच्या हिरव्यागार पिकाकडे वळली आहेत. हिरवा चारा व पाण्याच्या टंचाईमुळे गव्यांचे कळप शेतात घुसून उभी पिके फस्त करू लागली आहेत. आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास बाजार भोगाव परिसरात काळजवडे येथील शेतात गव्यांच्या कळपाने धुडगूस घातला. भरदिवसा शेतात गव्यांचे कळप आल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कष्ट करून उभे केलेले पीक गव्यांचे कळप फस्त करु लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतात मचान उभारून शेतकरी पिकाच्या राखण्यासाठी प्रयत्नशील असतात पण शेतात आलेल्या गव्याना हुसकवण्याचा प्रयत्न केल्यास ते अंगावर येत आहेत. वनखात्याकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाय योजना होत नाहीत.
हातातोंडाशी आलेला घास गव्यांनी खाला तर पुरेशी मदत मिळत नाही तर वाढलेले खताचे दर, मिळणारे रात्रपाळीने पाणी, रात्रभर जागून राखण करायची दिवसभर शेतात राबराबायचे आणि मदत मिळण्यासाठी सरकारी ऑफिसमध्ये हेलपाटे मारावे लागतात - कृष्णात कदम, शेतकरी