येथील मुख्य रस्त्यावर गौरी-शंकरोबा मुखवट्याचे आणि गणेशमूर्तींचे स्टॉल सजले असून, मूर्तींचे बुकिंग सुरू झाले आहे. जवळपास २० ते २५ विक्रेत्यांनी कसबा बावड्यातील मुख्य रस्त्यावर आपले स्टॉल थाटले आहेत.
जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे यंदा तुलनेत गणेशमूर्ती विक्रीसाठी कमी प्रमाणात आल्या आल्याने मूर्तींच्या किमतीत वाढ झाली असल्याचे मूर्ती विक्रेते गजानन बेडेकर यांनी सांगितले. पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत घरगुती मूर्तींचे दर आहेत, तर गौरीच्या मुखवट्याच्या जोडीचे दर ७०० ते ९०० रुपयांपर्यंत आहेत. शंकरोबाच्या मुखवट्याचे दर १८० ते २०० रुपयांच्या घरात आहेत.
भगवा चौक ते शुगर मिल कॉर्नर या मुख्य रस्त्यावरील अनेक दुकाने गाळे तात्पुरते भाड्याने घेऊन मूर्ती विक्रेत्याने आपले स्टॉल लावले आहेत. सध्या ग्राहकांकडून प्रतिसादही चांगला मिळत आहे.
फोटो : कसबा बावड्यातील मुख्य रस्त्यावर गणेशमूर्ती आणि गौरीचे मुखवटे विक्रीचे स्टॉल सजले आहेत.
( फोटो : रमेश पाटील, कसबा बावडा)