कोल्हापूर : केंद्रीय आयोोोगाच्या (युपीएससी) परीक्षेत कोल्हापुरातील राजारामपुरीतील गौरी नितीन पुजारी-किल्लेदार हिने देशात २७५ वी रँकसह, तर नेर्ली (ता. करवीर) येथील प्रणोती संजय संकपाळ हिने ५०१ रँक मिळवित यशाला गवसणी घातली.
अभ्यासाच्या जोरावर त्यांना यश मिळवत कोल्हापूरचा नावलौकिक केला आहे. युुपएससीच्या मंगळवारी दुपारी ऑनलाईन निकाल जाहीर झाला.
शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील गौरी हिने शालेय जीवनापासूनच युपीएससीत करिअर करायचे हे ठरविले होते. त्यानुसार बी.ई. मेकँनिकलची पदवी घेतल्यानंतर तिने तयारी सुरू केली. त्यात सन २०१७ आणि २०१८ च्या पूर्व परीक्षेत तिला यश मिळाले नाही. त्यावर ती खचून गेली नाही. तिने अभ्यासातील सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर २०१९ मध्ये पुन्हा परीक्षा देत यश मिळविले आहे.नेर्ली येथील शेतकरी कुटुंबांतील प्रणोती हिला शाळेपासूनच स्पर्धा परीक्षेची आवड होती. भारती विद्यापीठामधून बीडीएसची पदवी घेतल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.
सन २०१८ मध्ये तिने पहिल्यांदा परीक्षा दिली. पण, पूर्व परीक्षेत ती अयशस्वी ठरली. त्यावर तिने जोमाने तयारी करून गेल्यावर्षी परीक्षा दिली आणि दुसऱ्याच प्रयत्नांत यशाची कमाई केली. दरम्यान, यशस्वितांवर त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. फटाके वाजवून, साखर-पेढे वाटून त्यांनी आनंद व्यक्त केला.
या परीक्षेत यश मिळविल्याचा खूप आनंद आहे. तिसऱ्या प्रयत्नांत यशस्वी झाले. माझ्यात यशात आजोबा विश्वनाश, आजी विजया, वडील नितीन, आई निलजा, सासरे दिनकर किल्लेदार, पती दिग्विजय, बहीण उमा, भाऊ कुलदीप यांच्यासह शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.-गौरी पुजारी-किल्लेदार
दुसऱ्याच प्रयत्नात या परीक्षेत यशस्वी झाल्याचा फार आनंद वाटत आहे. आई संगीता, वडील संजय, बहीण पूर्वा, भाऊ पृथ्वीराज आणि शिक्षकांच्या पाठबळावरच मला यशाचे शिखर गाठता आले आहे.-प्रणोतीसंकपाळ