पेठ वडगाव : बुद्ध पोर्णिमेनिमित्त कोल्हापुरातील मायक्रो आर्टिस्ट संतोष कांबळे यांनी आपल्या कलाआविष्कारातून तथागत भगवान गौतम बुद्धांना अनोखे असे अभिवादन केले. अवघ्या 4 सेंटीमीटर म्हणजेच दीड इंच खडूमध्ये भगवान गौतम बुद्ध यांचे बोधिवृक्षाखाली बसलेले शिल्प साकारले आहे.शाळा म्हटलं की खडू आणि फळा यांचं समीकरण ठरलेलं.. आणि शिकवण्यासाठी शिक्षक.. पेशाने एक कलाकार व कलाशिक्षक असणारे व रंगीत खडू व फळा यांच्यामध्ये कलाकृती साकारणारे भादोले गावचे मायक्रो आर्ट साकारण्यात तरबेज असलेले आर्टिस्ट संतोष कांबळे हे पेठ वडगाव येथील बळवंतराव हायस्कूलमध्ये कलाशिक्षक आहेत. त्यांनी अवघ्या 4 सेंटीमीटर म्हणजेच दीड इंच खडू मध्ये भगवान गौतम बुद्ध यांचे बोधिवृक्षाखाली बसलेले शिल्प साकारले आहे. अत्यंत ठिसूळ असणारा हा खडू, परंतु या खडूतून काही अदभूत शिल्प रचना साकारून खडूचा अशा पद्धतीने ही वेगळा उपयोग होऊ शकतो हे दाखवण्याचे काम कलाशिक्षक संतोष कांबळे यांनी केले आहे. आजवर त्यांनी अनेक महापुरुष, नेते, स्वामी विवेकानंद, छत्रपती श्री शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, बाजीप्रभू देशपांडे श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम विठ्ठल रुक्मिणी इ देवदेवता तसेच अनेक मानवाकृती हुबेहूब खडूमध्ये कोरल्या आहेत. खडू बरोबरच आंघोळीच्या साबणामध्ये ही त्यांनी कोरलेल्या शिल्पकृती अत्यंत विलोभनीय आहेत. कोणत्याही जयंती पुण्यतिथी उत्सवाच्या वेळेला शालेय फलकावर फक्त खडूच्या साह्याने हुबेहूब प्रतिकृती रेखाटण्यात त्यांचा हातखंडा आहे.
video- खडूत साकारले गौतम बुद्ध, कोल्हापुरातील मायक्रो आर्टिस्ट संतोष कांबळे यांचा कलाआविष्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 15:14 IST