कोल्हापूर : म्हैसूरमधील जगनमोहन पॅलेसमधील जगप्रसिध्द ‘ग्लो आॅफ होप’ या चित्रासाठीच्या मॉडेल व चित्रकार दिवंगत एस. एल. हळदकणकर यांच्या कन्या गीता कृष्णकांत उपळेकर यांचे मंगळवारी सायंकाळी येथे मुलीच्या घरी निधन झाले. त्या 102 वर्षांच्या होत्या.
म्हैसूरमधील पॅलेसमध्ये राजा रविवर्मा यांच्या चित्रांसमवेत लावण्यात आलेले ग्लो आॅफ होप हे हातात दिवा घेतलेल्या तरुणीचे सुंदर चित्र राजा रविवर्मा यांनीच रेखाटल्याचा अनेकांचा समज होता. मात्र हे चित्र सावंतवाडी येथील चित्रकार एस.एल.हळदणकर यांनी काढले आहे. त्यांची पंधरा वर्षाची मुलगी गीता दिवाळीसाठी आईकरिता आणलेली साडी नेसून हळदणकर यांच्यासमोर आली आणि त्यांनी गीताला मॉडेल म्हणून उभे करून ग्लो आॅफ होप हे चित्र रेखाटले. वेगवेगळ्या प्रदर्शनात हे चित्र लक्षवेधी ठरल्याने अनेक धनिकांनी ते विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र आपल्याच मुलीचे चित्र विकण्यास हळदणकर यांनी नकार दिला होता.