वारणानगर : स्वर्गीय ग.दि.माडगूळकर आणि स्वर्गीय सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वारणा विविध उद्योग व शिक्षणसमूह निर्मित वारणा बालवाद्यवृंद गीतरामायण सादर करणार आहे. कोल्हापूर येथील संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृहात शनिवारी ( दि .५ ) सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम असल्याची माहिती वारणा समुहाचे प्रमुख, माजी मंत्री डॉ.विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरे म्हणाले , वारणेचे ५० हून अधिक बालकलाकार संगीत संयोजनातून हा कार्यक्रम सादर करतील. यावेळी गदिमांचे चिरंजीव शरतकुमार माडगुळकर ,नातू सुमित्र श्रीधर माडगुळकर व कुटुंबियांना निमंत्रित करण्यात आले आहे.सहकारमहर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी वारणेच्या तीरावर शिक्षण, कला, क्रीडा,संस्कृती यांची जाणीवपूर्वक जोपासना केली. त्यांनी सन १९६९ साली अभिजात भारतीय संगीताचे संस्कार मुलांना बालवयातच व्हावे यासाठी वारणा बालवाद्यवृदांची निर्मिती केली. देशात वारणा श्रीखंड व वारणा साखर कारखान्याचा हा बालवाद्यवृंद वारणेचा एक ब्रॅन्ड म्हणून देशभर पोहचला होता. त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जोपासत गेली ५० वर्षे वारणा बालवाद्यवृंदाचे बालकलाकार भारतीय संगीताची साधना अखंडपणे करीत आहेत. याप्रवासामध्ये त्यांनी संगीत सौभद्र, महाराष्टाचे लोकसंगीत, शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत, यासारखे अनेक यशस्वी प्रयोग साकारले आहेत.
संपूर्ण देशाबरोबरच त्यांनी युगोस्लाव्हीया,दक्षिण आफ्रिका, मॉरीशिस यादेशामध्ये वारणा बालवाद्यवृंदाच्या कलाकारांनी संगीत कार्यक्रमाच्या माध्यमातून संगीत क्षेत्राचे नाव पोहचवले. स्वर्गीय इंदीरा गांधी यांनी वारणेच््या बालचमुनांदेखील कार्यक्रमासाठी परदेश दौऱ्यासाठी निमंत्रित केले होते.
कोल्हापूर येथे शनिवारी दि.५ रोजी होणाया बालकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंदकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कोल्हापूर, सांगलीचे महापौर , नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती ,सदस्य, वारणा समुहातीत पदाधिकारी,संचालक आदी सह संगीतक्षेत्रातील दिग्गज मान्यवर,कलाकारांनाही कार्यक्रमाला निमंत्रित केले आहे. सर्वांना मोफत प्रवेश असून लाभ घेण्याचे आवाहन डॉ.कोरे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेस दिग्दर्शक जीवनकुमार शिंदे , विजय पाठक, संतोष सुतार , विकास चौगुले , नंदकिशोर जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते...